कल्याण : कचरा संकलनात हलगर्जीपणा करणाऱ्या ३ प्रभाग क्षेत्रांतील खासगी कंत्राटदारांचा ठेका रद्द करण्याचा निर्णय केडीएमसी प्रशासनाकडून घेण्यात आला आहे. या तिन्ही प्रभागांमध्ये आता केडीएमसी प्रशासनाकडूनच सकाळऐवजी दुपारच्या सत्रात कचरा संकलन केले जाणार असून नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त अतुल पाटील यांनी केले आहे. तसेच केडीएमसी क्षेत्रात सात प्रभागांसाठी नियुक्त करण्यात आलेल्या नविन खासगी एजन्सीचे कामही लवकरच सुरू होणार असून त्यानंतर हा सर्व प्रश्न मार्गी लागणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.
कल्याण - डोंबिवली महापालिका क्षेत्रातील बी, डी आणि जे या तीन प्रभागक्षेत्र कार्यालयांतर्गत कचरा संकलनासाठी आर अँड बी कंपनीला कंत्राट देण्यात आले होते. मात्र या कंपनीकडून जुन्या झालेल्या कचऱ्याचा गाड्या, सतत उद्भवणाऱ्या तांत्रिक समस्या आणि नादुरुस्त असलेल्या गाड्यांमुळे या तिन्ही प्रभागांतील कचरा संकलनावर मोठा परिणाम झाला होता. या प्रभागातील कचरा संकलन व्यवस्थित होत नसल्याबद्दल अनेक स्थानिक लोकप्रतिनिधी आणि नागरिकांनी केडीएमसी प्रशासनाकडे वारंवार तक्रारी केल्या होत्या. त्यावर केडीएमसी प्रशासनाने संबंधित कंत्राटदाराला रीतसर नोटीसही बजावली होती. मात्र त्यानंतरही परिस्थितीत कोणतीच सुधारणा न झाल्याने अखेर या कंत्राटदाराचा ठेका रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त अतुल पाटील यांनी दिली.
तसेच त्यांच्याऐवजी आता केडीएमसीच्या सफाई कर्मचारी आणि यंत्रणेकडूनच बी, डी आणि जे प्रभागांमध्ये कचरा संकलन केले जाणार आहे. हे काम दु. २ ते रा. १० या वेळेत केले जाणार आहे.
सहकार्य करण्याचे केडीएमसीचे आवाहन
केडीएमसी क्षेत्रातील ए, बी आणि सी हे तीन प्रभाग वगळता उर्वरित ७ प्रभागांतील कचरा संकलन, वाहतूक आणि प्रक्रिया पद्धतीसाठी नवीन एजन्सीची नियुक्ती करण्यात आली आहे. येत्या दोन ते अडीच महिन्यांमध्ये या एजन्सीचे काम सुरू होणार असून त्यानंतर या सातही प्रभागांतील सफाई कर्मचारी आणि इतर यंत्रणा केडीएमसी प्रशासनाकडून ए, बी, सी प्रभागांमध्ये वळवण्यात येणार आहे. मोठ्या प्रमाणात ही यंत्रणा उपलब्ध झाल्यानंतर या तिन्ही प्रभागांमध्ये आणखी चांगल्या पद्धतीने साफसफाई आणि स्वच्छतेचे नियोजन करणे शक्य होणार असल्याची माहितीही उपायुक्त अतुल पाटील यांनी दिली. तसेच कचरा संकलन करणाऱ्या गाडीला उशिरा झाल्यास रस्त्यावर, मोकळ्या जागेमध्ये किंवा उघड्यावर कचरा न टाकण्याचे आवाहनही उपायुक्त पाटील यांनी केले आहे.