कल्याणमध्ये लाेकसभा उमेदवारांचे शाब्दिक युद्ध

शिंदे-भाजप गटात कोणाला उमेदवारी द्यायची याबाबत चांगलीच जुंपलेली असताना अखेर भाजपच्या फडणवीसांनी एका कार्यक्रमात डॉ. श्रीकांत शिंदेनाच उमेदवारी देण्याचे जाहीर केले.
कल्याणमध्ये लाेकसभा उमेदवारांचे शाब्दिक युद्ध
Published on

कल्याण/डोंबिवली : कल्याण लोकसभा कोण लढवणार याबाबत अेनक वादविवाद झाल्यानंतर ठाकरे गटाने पहिली बाजी मारत वैशाली दरेकर यांची उमेदवारी घोषित केली. शिंदे-भाजप गटात कोणाला उमेदवारी द्यायची याबाबत चांगलीच जुंपलेली असताना अखेर भाजपच्या फडणवीसांनी एका कार्यक्रमात डॉ. श्रीकांत शिंदेनाच उमेदवारी देण्याचे जाहीर केले. कल्याण लोकसभेसाठी डॉ. श्रीकांत शिंदे आणि वैशाली दरेकर यांच्या लढत होणार हे पक्के झाले असले तरी सध्या डॉ. शिंदे यांनी दरेकर यांच्यात शाब्दिक वॉर सुरू झाल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.

आदित्य ठाकरे यांची निवडणुकीत माझ्या समोर उभे राहण्याची हिंमत नाही - डॉ. श्रीकांत शिंदे

मोठी मोठी वल्गना करणारे, या मतदारसंघात लढू असे म्हणणारे चेहरे ते गेले कुठे? आदित्य ठाकरे, वरुण सरदेसाई हे या मतदारसंघात का उभे राहिले नाही? स्थानिक कार्यकर्त्यांना लढायला उभे केले. याचे असे आहे की, 'तूम लढो हम कपडे सांभालते है' अशी भूमिका त्यांची आहे. येथील विकासकामे पाहून त्यांची या मतदारसंघात उभे राहण्याची हिंमत झाली नसल्याचा टोला विद्यमान खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी लगावला.

कल्याण-डोंबिवलीत विकासाचे धोरण अनेक वर्षांपासून राबविले जात आहे. कल्याण लोकसभा मतदारसंघासाठी आदित्य ठाकरे, वरुण सरदेसाई, सुषमा अंधारे, केदार दिघे, सुभाष देसाई यांची नावे उमेदवार म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून विचारात घेतली जातील, अशी चर्चा होती. मात्र ३ तारखेला शिवसेना ठाकरे गटाकडून वैशाली दरेकर यांना उमेदवारी जाहीर झाली. याबाबत शिवसेनेचे विद्यमान खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांना पत्रकारांनी विचारले असता ते म्हणाले, मोठी मोठी वल्गना करणारे, या मतदारसंघात लढू असे म्हणणारे चेहरे होते ते गेले कुठे? आदित्य ठाकरे, वरुण सरदेसाई हे या मतदारसंघात का उभे राहिले नाहीत? स्थानिक कार्यकर्त्यांना लढायला उभे केले. पुढे डॉ. शिंदे म्हणाले, कल्याण लोकसभा मतदारसंघातील झालेली विकास कामे पाहून जनता मला मोठ्या मताधिक्यांनी निवडून आणतील. येथील जनता विकासाच्या बाजूने, महायुतीच्या बाजूने, महायुतीच्या उमेदवाराच्या बाजूने असल्याचा ठाम विश्वास कार्यकर्त्यांमध्ये असल्याचे त्यांनी म्हटले. देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान बनवायचे आहे. देशाचा विकासाचा आलेख आणखी पुढे न्यायचा असल्याचे शिंदे यांनी म्हटले आहे.

डॉ. श्रीकांत शिंदे कमळावर लढणार की धनुष्यबाणावर : वैशाली दरेकर-राणे

देवेंद्र फडणवीस यांनी श्रीकांत शिंदे यांची कल्याण लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केल्यानंतर ठाकरे गटाच्या उमेदवार वैशाली दरेकर-राणे यांनी श्रीकांत शिंदे यांना टोला लगावला आहे. याबाबत वैशाली दरेकर यांनी बोलताना श्रीकांत शिंदे यांना उमेदवारी जाहीर झाली हे ऐकून आनंद झाला. मात्र उमेदवारी जाहीर झाली खरी मात्र ते कमळावर लढणार की धनुष्यबाणावर, याबाबत संभ्रम आहे. उमेदवारी देवेंद्र फडणवीस जाहीर करतील ही नामुष्की त्यांच्यावर ओढवली आहे. श्रीकांत शिंदे यांना उमेदवारी जाहीर झाली म्हणून काही फरक पडत नाही, भाजप कार्यकर्ते ठरवतील काय करायचे ते, असेही दरेकर यांनी म्हटले आहे.

दरम्यान कल्याण लोकसभा उमेदवार वैशाली दरेकर यांनी शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते, आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या घरी सदिच्छा भेट दिली. यावेळी ऋता आव्हाड यांनी दरेकर यांची ओटी भरली. यावेळी सोबत ठाणे लोकसभा खासदार राजन विचारे, युवा नेते वरुण सरदेसाई, जिल्हा प्रमुख केदार दिघे, कल्याण जिल्हा प्रमुख सदानंद थरवळ आदी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

logo
marathi.freepressjournal.in