

कल्याण : कल्याण रेल्वे स्थानकावर झोपलेल्या मजुर दाम्पत्याचे आठ महिन्यांचे बाळ पळवून नेणाऱ्या तरुणासह त्याच्या आत्याला पोलिसांनी अवघ्या सहा तासांत अटक केली. पोलिसांच्या तात्काळ कारवाईमुळे बाळाची सुखरूप सुटका होऊन त्याला आईवडिलांच्या स्वाधीन करण्यात आले.
मिळालेल्या माहितीनुसार, अटक केलेल्यांची नावे अक्षय खरे आणि त्याची आत्या सविता खरे अशी आहेत. पीडित दाम्पत्य निलेश कुंचे आणि पूनम कुंचे हे पुण्याहून कामाच्या शोधात कल्याणला आले होते. मजुरीचे काम आणि राहण्यासाठी जागा न मिळाल्याने ते आपल्या तीन मुलांसह स्थानक परिसरात झोपले होते. दरम्यान, संधीचा फायदा घेत अक्षय आणि सविता यांनी आठ महिन्याच्या बाळाला उचलून नेले.
घटनेची सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना मिळताच कल्याण लोहमार्ग पोलीस आणि महात्मा फुले पोलीस ठाण्याने संयुक्त कारवाई करत संशयितांचा शोध सुरू केला. अवघ्या सहा तासांच्या तपासानंतर दोघांना अटक करण्यात आली आणि बाळाची सुरक्षित सुटका करण्यात यश आले. सध्या पोलिस बाळ चोरीमागील हेतू काय होता, याचा तपास करत आहेत. “पोलिसांनी तात्काळ प्रतिसाद देत समन्वयातून कारवाई केल्याने बाळ सुखरूप सापडले. नागरिकांनीही अशा घटनांबाबत तत्परतेने माहिती द्यावी,” असे पोलिस सूत्रांनी सांगितले.