
कल्याणमध्ये अवघ्या १३ वर्षांच्या लहानग्या मुलीवर लैंगिक अत्याचार करुन तिचा खून करणारा नराधम आरोपी विशाल गवळी याने रविवारी पहाटे (दि.१३) आत्महत्या केली. तो तळोजा कारागृहात गुन्ह्याची शिक्षा भोगत होता.
प्राथमिक माहितीनुसार, पहाटे ४ ते ५ च्या दरम्यान तुरुंगातील शौचालयात त्याने टॉवेलच्या सहाय्याने गळफास लावून घेतला. त्याचा मृतदेह जे .जे .रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. विशाल गवळी कल्याणमधील कुप्रसिद्ध गुंड होता.
दरम्यान, विशाल गवळीचे आत्महत्येचे वृत्त समोर येताच त्याच्या वकिलांनी संशय व्यक्त केला आहे. तर, मृत मुलीच्या वडिलांनी समाधान व्यक्त करीत मुलीच्या प्रतिमेला पुष्पहार घालून दिवा लावून पूजन केले. त्यानंतर 'जशास तसा' न्याय झाला, अशी प्रतिक्रिया प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली.
प्रकरण काय?
कल्याण पूर्व येथील एका अल्पवयीन मुली गेल्चेया वर्षी डिसेंबर महिन्यात २३ तारखेला संध्याकाळी अपहरण झाले होते. आईकडून २० रुपये घेऊन ही अल्पवयीन मुलगी खाऊ आणण्यासाठी दुकानात गेली होती. मात्र, ती परत न आल्याने कुटुंबियांनी मुलीचा शोध सुरू केला. बराच कालावधी उलटूनही मुलगी परत न आल्याने मुलीच्या वडिलांनी मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार कोळसेवाडी पोलीस ठाण्यात केली. दुसऱ्या दिवशी २४ डिसेंबरला मुलीचा मृतदेह कल्याणनजीक बापगाव परिसरात सापडला. विशालने सायंकाळी पाच वाजता अल्पवयीन मुलीला फूस लावून घरात घेतले व मुलीसोबत गैरकृत्य करून तिची हत्या केली. त्यानंतर एका मोठ्या बॅगेमध्ये त्याने मुलीचा मृतदेह भरून ठेवला. सायंकाळी सात वाजता पत्नी घरी आली, तेव्हा घडलेला प्रकार त्याने पत्नी साक्षीला सांगितला. पतीने केलेले कृत्य ऐकून साक्षीला धक्का बसला. नंतर दोघांनी पुरावे नष्ट करण्यासाठी आधी घरातले रक्त पुसले. त्यानंतर मृतदेहाची विल्हेवाट कशी लावायची याची योजना आखली. रात्री साडेआठ वाजता विशालने मित्राची रिक्षा बोलावून घेतली व दोघेही मृतदेह घेऊन नऊ वाजता बापगावच्या दिशेने रवाना झाले. मृतदेह फेकून दोघे परतले, परतत असताना विशालने आधारवाडी चौकातून दारू विकत घेतली आणि तेथून आपल्या पत्नीच्या माहेरी बुलढाणा येथे तो निघून गेला. मात्र, घराजवळ सापडलेल्या रक्तामुळे विशालनेच हे कृत्य केल्याचा संशय पोलिसांना आला. त्यानंतर सीसीटीव्ही फुटेजच्या सहाय्याने पोलिसांनी या प्रकरणाचा उलगडा केला आणि विशालला शेगाव येथून अटक केली होती. कल्याणमधील ही घटना समोर आल्यानंतर नागरिक रस्त्यावर उतरले होते.