
कल्याण : कल्याण पूर्वेतील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली होती. या मृत मुलीच्या कुटुंबीयांना धमकी आणि शिवीगाळ केल्याचा प्रकार समोर आला आहे. मध्यरात्रीच्या सुमारास मृत मुलीच्या घराबाहेर एक तरुण दारू पिऊन धिंगाणा घालत आहे. सीसीटीव्हीत कैद झालेला हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिची निर्दयीपणे हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार कल्याणमध्ये घडला होता. या प्रकरणी कोळशेवाडी पोलिसांनी आरोपी विशाल गवळी आणि त्याची पत्नी साक्षी गवळीला अटक केली. दोघेही सध्या तुरुंगात आहेत. आरोपी विशाल गवळीच्या तीन भावांना जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहे. असे असले तरी मृत मुलीच्या कुटुंबीयांना धमकावल्याचा प्रकार समोर आला आहे.
रविवारी रात्री दोन वाजेच्या सुमारास पीडित कुटुंबाच्या घराबाहेर तिघे जण दुचाकीवरून आले होते. त्यांच्यातील एक तरुण शिवीगाळ करत होता. आरोपीचा जामीन झाला नाही तर आम्ही एके ४७ घेऊन येतो, अशी धमकी तो देत होता.
हा सारा प्रकार येथील सीसीटीव्हीत कैद झाला आहे. त्यामुळे पीडित मुलीच्या कुटुंबीयांना पोलीस संरक्षण देण्याची मागणी होत आहे.