
डोंबिवली : कल्याणमध्ये एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करणाऱ्या विशाल गवळी आणि त्याची पत्नी साक्षी गवळी यांना कल्याण जिल्हा सत्र न्यायालयाने दोन दिवसांची अतिरिक्त पोलीस कोठडी सुनावली आहे. गवळी यांच्या पोलीस कोठडीचा कार्यकाल संपल्याने त्यांना गुरुवारी न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्यावेळी पोलिसांनी कोठडीत वाढ करण्याची विनंती केली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणात अजून काही महत्त्वाचे पुरावे गोळा करायचे आहेत. विशालने गुन्ह्याच्या वेळी वापरलेले सीमकार्ड, गटारात फेकलेला मोबाईल आणि खाडीत टाकलेली पिशवी यांचा शोध घेण्याचे काम अद्याप सुरू आहे. तसेच मृत मुलीचा मृतदेह ज्या ठिकाणी फेकण्यात आला होता, त्या भागातील सीसीटीव्ही फुटेजही पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याची माहिती न्यायालयात दिली. यावर विशाल गवळीच्या वकिलांनी न्यायालयात तक्रार केली की तपास जवळपास पूर्ण झाला आहे आणि पोलिसांना त्याची पुढील चौकशीची गरज नसल्याचे सांगत विशालला आणि साक्षीला न्यायालयीन कोठडी देण्याची मागणी केली. मात्र, पीडित कुटुंबीयांचे वकील ॲड. नीरज कुमार यांनी याला कडाडून विरोध केला. ॲड. नीरज कुमार म्हणाले की, पोलीस तपास अद्याप अपूर्ण असून आरोपींना न्यायालयीन कोठडी दिल्यास तपासास अडथळा निर्माण होऊ शकतो.
बदलापूरमधील अत्याचार प्रकरणाचा संदर्भ देत आरोपीच्या वकिलांनी अशी भीती व्यक्त केली की, विशाल आणि त्याच्या पत्नीला पोलीस चकमकीत ठार मारले जाऊ शकते. त्यामुळे त्यांना पोलीस कोठडीत नातेवाईकांच्या संपर्कात राहण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी केली.मात्र, न्यायालयाने ही मागणी फेटाळून लावली.