कल्याणमधील रस्त्याची दुरवस्था; काँग्रेसचे उपोषण

कल्याण पूर्वेतील श्रीकृष्णनगर ते पत्री पूल मार्गे नवी गोविंदवाडीपर्यंत जाणारा रस्ता पूर्णपणे उखडून गेला असून, खड्ड्यांनी या रस्त्याची चाळण झाली आहे. प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करूनही कोणतीच कार्यवाही न झाल्याने स्थानिक नागरिक आणि काँग्रेस कार्यकर्त्यांनी अनोख्या पद्धतीने निषेध व्यक्त करत काँग्रेसचे पदाधिकारी शकील खान उपोषणाला सुरुवात केली आहे.
कल्याणमधील रस्त्याची दुरवस्था; काँग्रेसचे उपोषण
Published on

डोंबिवली : कल्याण पूर्वेतील श्रीकृष्णनगर ते पत्री पूल मार्गे नवी गोविंदवाडीपर्यंत जाणारा रस्ता पूर्णपणे उखडून गेला असून, खड्ड्यांनी या रस्त्याची चाळण झाली आहे. रस्त्यावर साचलेले पाणी आणि चिखलामुळे वाहनचालक, शाळकरी विद्यार्थी आणि नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले आहेत. प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करूनही कोणतीच कार्यवाही न झाल्याने काँग्रेसचे पदाधिकारी शकील खान यांनी उपोषणाला सुरुवात केली आहे.

या दरम्यान, स्थानिक नागरिक आणि काँग्रेस कार्यकर्त्यांनी अनोख्या पद्धतीने निषेध व्यक्त करत रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये झाडे लावली. तसेच या रस्त्याला प्रतीकात्मकरीत्या अभिनव गोयल मार्ग असे नाव देत केडीएमसी आयुक्तांविरोधात नाराजी व्यक्त केली.

दरम्यान, नागरिकांनी प्रशासनाच्या कारभाराविरोधात नाराजी व्यक्त करत या रस्त्याची स्थिती इतकी बिकट झाली आहे की, शाळकरी मुलांना रोज खड्ड्यांतून मार्ग काढावा लागतो. रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य तयार झाल्याने अनेक वेळा अपघाती घटना घडत असताता, असे होत असताना देखील प्रशासन दुर्लक्ष करत आहेत. या परिसरात चार शाळा असून, विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.

महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी तातडीने हा रस्ता दुरुस्त करावा अन्यथा मोठ्या प्रमाणावर तीव्र आंदोलन छेडले जाईल. खड्ड्यांमुळे नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे आणि केडीएमसी प्रशासन मात्र गाढ झोपेत आहे. दरम्यान, पावसाळ्याच्या काळात कल्याण-डोंबिवली परिसरातील बहुतेक रस्त्यांची स्थिती अत्यंत वाईट झाली आहे. चार महिन्यांपासून नागरिक खड्डेमय रस्त्यांवरून प्रवास करत आहेत, तर केडीएमसीकडून फक्त डांबर टाकण्याचा दिखावा केला जात आहे. - शकील खान, काँग्रेस नेते

logo
marathi.freepressjournal.in