विद्यार्थ्यांना कपाळावर टिळा, टिकली, राखीला बंदी; कल्याणमधील गांधी इंग्लिश स्कूलचा अजब फतवा
कल्याण : येथील गांधी इंग्लिश स्कूलने विद्यार्थ्यांवर एक विचित्र फतवा काढत कपाळावर टिळा, टिकली लावणे तसेच हातात राखी बांधण्याला बंदी घातली आहे. या निर्णयामुळे पालकांमध्ये संतापाची लाट उसळली असून, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) ने या प्रकरणी शाळा प्रशासनाला जाब विचारला आहे.
विद्यार्थ्यांना धार्मिक ओळख दाखवणारे टिळा-टिकली लावू नये, असा नियम शाळेने लादल्याने अनेक पालकांनी नाराजी व्यक्त केली आहे. पालकांच्या तक्रारीनंतर या प्रकरणी शिक्षणाधिकाऱ्यांनी शाळेला नोटीस बजावली असून सक्ती त्वरित मागे घ्यावी, अशी मागणी केली आहे. माझ्या मुलालाही हा नियम लागू केला गेला, याबाबत मुख्याध्यापकांकडे विचारणा केली असता समाधानकारक उत्तर मिळाले नाही. त्यामुळे आम्ही शिक्षणाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली आहे. जर शाळेने पुन्हा असा फतवा काढला, तर शिवसेनेमार्फत आंदोलन करण्याचा इशारा ठाकरे गटाचे पदाधिकारी रुपेश भोईर यांनी दिला आहे.