
डोंबिवली : कल्याण पूर्वेकडील चारमजली ‘सप्तशृंगी’ इमारतीतील स्लॅबचा काही भाग कोसळून सहा जणांचा मृत्यू झाला, तर चार जण जखमी झाले आहेत. ही घटना मंगळवारी दुपारी कल्याण पूर्वेतील कर्पेवाडी परिसरात घडली.
या घटनेची माहिती मिळताच पालिकेचे अधिकारी आणि अग्निशमन विभागाचे बचाव पथक आणि पोलीस प्रशासन बचावकार्यासाठी घटनास्थळी दाखल झाले. मिळालेल्या माहितीनुसार, दुसऱ्या मजल्याचा स्लॅब थेट तळमजल्यापर्यंत कोसळला. ढिगाऱ्याखालून चार जणांना बाहेर काढण्यात यश आले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
पालिकेकडून मिळालेल्या माहितीनुसार, ही इमारत धोकादायक इमारतींच्या यादीत होती आणि ती पावसाळ्यापूर्वी रिकामी करण्याची नोटीसही बजावण्यात आली होती. मंगळवारी दुपारी सव्वा दोन वाजण्याच्या सुमारास श्री सप्तशृंगी सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या इमारतीचा स्लॅब कोसळल्याची माहिती मिळाली, असे पोलिसांनी सांगितले.
दरम्यान, मृतांच्या कुटुंबियांना शासनातर्फे प्रत्येकी पाच लाखांचे अर्थसहाय्य देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. इमारतीतील नागरिकांना जवळील ज्ञानमंदिर विद्यालय येथे तात्पुरते स्थलांतरित करण्यात आले असून महानगरपालिकेतर्फे राहण्याची व जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे.
मृतांची नावे
नमस्वी श्रीकांत शेलार, (वय २ वर्षे), प्रमिला कालचरण साहू, (५६), सुनीता नीलांचल साहू, (३८), सुशीला नारायण गुजर (७८), व्यंकट भीमा चव्हाण (४२), सुजाता मनोज वाडी (३८)
जखमींची नावे
विनायक मनोज पाधी (वय ४), शर्विल श्रीकांत शेलार (४) ही मुले आशीर्वाद रुग्णालयात, निखिल चंद्रशेखर खरात (२६) हे चैतन्य हॉस्पिटल तर अरुणा वीर नारायण हा अमेय रुग्णालयात दाखल आहे.