

कल्याण : कल्याण-डोंबिवली महानगरपालिका अंतर्गत राबविण्यात येत असलेल्या स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत ‘कल्याण पश्चिम स्टेशन परिसर सुधारणा’ कामाने आधुनिकतेकडे मोठे पाऊल टाकले आहे. स्मार्ट कल्याण डोंबिवली डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडमार्फत सुरू असलेल्या या प्रकल्पातील ‘फ्लायओव्हर-ए (सुभाषचंद्र बोस चौक ते बैलबाजार चौक)’ या उड्डाणपुलाचे काम अंतिम टप्प्यात पोहोचले आहे. यूएचपीएफआरसी तंत्रज्ञानाचा वापर करून काल मध्यरात्री यशस्वीरीत्या गर्डर लॉन्चिंग करण्यात आले.
सुमारे ११२५ मीटर लांबी व १८ ते ९ मीटर रुंदी असलेल्या या उड्डाणपुलामुळे परिसरातील वाहतूककोंडी कमी होण्यास मदत होणार आहे. या उड्डाणपुलाच्या स्पॅन AP14-ACP1 आणि ACPI-ACP2 या भागांमध्ये बांधकामासाठी मलेशियातून विकसित करण्यात आलेल्या ‘Ultra-High Performance Fiber Reinforced Concrete (यूएचपीएफआरसी)’ या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. या कामासाठी आयआयटी, मुंबई यांनी स्ट्रक्चरल डिझाईन (प्रूफ चेकिंग) साठी तांत्रिक सहकार्य दिले आहे.
कल्याण स्टेशन परिसरातील पंडित जवाहरलाल नेहरू चौक (प्रवेशद्वार क्र. १) येथील विद्यमान पादचारी पूल (एफओबी) काढण्याची आवश्यकता होती; मात्र प्रवाशांची मोठी वर्दळ लक्षात घेता तो कायम ठेवण्यात आला. त्यामुळे यूएचपीएफआरसी तंत्रज्ञानाचा वापर करून काल मध्यरात्री यशस्वीरीत्या गर्डर लॉन्चिंग करण्यात आले. या वेळी महापौर हर्षाली चौधरी, आयुक्त अभिनव गोयल, शहर अभियंता अनिता परदेशी, कार्यकारी अभियंता रोहिणी लोकरे तसेच प्रकल्प सल्लागार व कंत्राटदार उपस्थित होते.
यूएचपीएफआरसी तंत्रज्ञानाची वैशिष्ट्ये
यूएचपीएफआरसी हे पारंपरिक काँक्रीटपेक्षा अनेक पटीने मजबूत आणि लवचिक असून, सिमेंट, सिलिका फ्युम, विशेष स्टील फायबर्स आणि रसायनांच्या मिश्रणातून तयार केले जाते. याची संकुचन शक्ती सामान्य काँक्रीटपेक्षा ५ ते ६ पट अधिक असल्याने पूल अधिक टिकाऊ ठरतो. हे काँक्रीट अत्यंत दाट असल्यामुळे हवामान आणि प्रदूषणाचा त्यावर कमी परिणाम होतो, परिणामी पुलाचे आयुष्य १०० वर्षांपेक्षा अधिक असण्याची अपेक्षा आहे तसेच यामध्ये तडे जाण्याचे प्रमाण अत्यल्प असल्याने भविष्यातील देखभाल खर्चही कमी होतो.
वाहतूककोंडी फुटणार : या अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरामुळे कल्याण पश्चिम स्टेशन परिसरातील वाहतूककोंडी सोडवण्यास मोठी मदत होणार असून शहराच्या पायाभूत सुविधांमध्ये महत्त्वाची भर पडणार आहे. विशेष म्हणजे, मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वेवरील ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पातही यूएचपीएफआरसी तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आलेला आहे.