
कल्याण : पाच जणांनी घरात घुसून हल्ला केल्याने एका १९ वर्षीय तरुणीचा जागीच मृत्यू झाल्याची घटना कल्याण पश्चिममधील इंदिरानगर परिसरात सोमवारी घडली. महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गुलाम सुभानी शेख उर्फ मुन्ना (४५), अब्दुल रहेमान गुलाम सुभानी शेख, शोएब रहीम शेख, अजिज इब्राहिम शेख, शाहीद युसुफ शेख अशी अटक केलेल्यांची नावे आहेत, तर सानिया मोईन बागवान असे मृत्यू पावलेल्या तरुणीचे नाव आहे. गुलाम शेख उर्फ मुन्ना शेख हा निसार सय्यदकडे दारूसाठी दोनशे रुपये मागत होता. निसार सय्यदने मुन्नाला सांगितले, मी तुला ओळखत नाही, तुला पैसे का देऊ. यानंतर मुन्ना आणि निसार यांच्यात धक्काबुक्की झाली. काही वेळाने मुन्ना, त्याचा मुलगा अब्दुल रहमान शेख आणि त्याचे साथीदार शोएब शेख, अजिज शेख, शाहीद शेख हे रात्री दहाच्या सुमारास सय्यदच्या घरात घुसले. त्यांनी सय्यदला मारहाण करण्यास सुरुवात केली. दरम्यान, सय्यद यांची १९ वर्षांची मुलगी सानिया मोईन बागवान ही भांडण सोडवण्यासाठी गेली असता मारेकऱ्यांनी तिच्या डोक्यावर रॉडने हल्ला चढविला. या हल्ल्यात तिचा जागीच मृत्यू झाला. सानियाचे लग्न २०२४ ऑक्टोबरमध्ये झाले होते.
तिचे सासर मलकापूर बुलढाणा येथे होते. सुट्टीच्या दरम्यान आपल्या आईचा इलाज करण्यासाठी ती कल्याणला आली होती.