
बदलापूर : सुमारे दशकभरापासून चर्चेत असलेल्या कांजूर मार्ग ते बदलापूर या मेट्रो मार्गाला एमएमआरडीएच्या अर्थसंकल्पात तत्त्वतः मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे आता या मेट्रो मार्गाच्या उभारणीला वेग येण्याची चिन्हे दिसत आहेत. राज्य सरकारने ही बदलापूरकरांना दिलेली गुढीपाडव्याची भेट असल्याची भावना आमदार किसन कथोरे यांनी व्यक्त केली असून मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांचे आभार मानले आहेत.
दहा वर्षांत याबाबत कोणतीही कार्यवाही झाली नाही, मात्र अलीकडेच बदलापुरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. लवकरात लवकर हे काम मार्गी लावले जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले होते. तातडीने हे काम सुरू करण्याचे आदेशही त्यांनी दिले आहेत. त्यामुळे या कामाला आता वेग येणार असल्याचे किसन कथोरे यांनी सांगितले. राज्य सरकारने बदलापूरकरांना दिलेली ही मेट्रोची गुढीपाडवा भेट असल्याचे सांगून त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार यांचे बदलापूरकरांच्या वतीने आभार मानले आहेत.
दहा वर्षांपासून प्रलंबित
मेट्रो १४ हा कांजूरमार्ग ते बदलापूर मेट्रो मार्ग ३७.८ किमी लांबीचा आहे, या मार्गावर १५ स्थानके असणार आहेत. बदलापुरातून दररोज हजारो चाकरमानी मुंबईला प्रवास करीत असतात त्यांची बदलापूरपर्यंत मेट्रो यावी, अशी मागणी होती. त्यानुसार आमदार किसन कथोरे यांनी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे दहा वर्षांपूर्वी याबाबत मागणी केली होती. निवडणुकीची आचारसंहिता लागल्याने हा विषय प्रलंबित राहिला.