ठाणे-पालघरमध्ये करटुले खातेय भाव; चिकनपेक्षाही महाग, ऐन श्रावणात शाकाहारींच्या खिशाला कात्री

ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील बाजारपेठांमध्ये रानभाजी करटुल्याची आवक घटल्याने तिच्या दरात मोठी वाढ झाली आहे.
ठाणे-पालघरमध्ये करटुले खातेय भाव; चिकनपेक्षाही महाग, ऐन श्रावणात शाकाहारींच्या खिशाला कात्री
ठाणे-पालघरमध्ये करटुले खातेय भाव; चिकनपेक्षाही महाग, ऐन श्रावणात शाकाहारींच्या खिशाला कात्री
Published on

भिवंडी : ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील बाजारपेठांमध्ये रानभाजी करटुल्याची आवक घटल्याने तिच्या दरात मोठी वाढ झाली आहे. ऐन श्रावण महिन्यात शाकाहारी नागरिकांकडून करटुल्याला मोठी मागणी असताना सध्या ही भाजी चांगलाच भाव खात आहे. त्यामुळे करटुल्याची भाजी खरेदी करण्यासाठी ग्राहकांना नेहमीपेक्षा अधिक पैसे मोजावे लागत असून, शाकाहारप्रेमींच्या खिशाला कात्री लागत असल्याचे चित्र आहे.

मागील वर्षी करटुले साधारणपणे १०० ते १२० रुपये किलो दराने उपलब्ध होत होते. मात्र, यंदा बाजारात करटुले तब्बल ८० रुपये पाव किलो, म्हणजेच सुमारे ३०० ते ३२० रुपये किलो दराने विकले जात आहेत. विशेष म्हणजे सध्या चिकनचे दर सुमारे २०० रुपये किलो असताना करटुल्यांसाठी ३०० रुपयांहून अधिक मोजावे लागत असल्याने ग्राहकांमध्ये याची चर्चा रंगली आहे.

करटुले ही रानभाजी असून तिची मोठ्या प्रमाणावर शेतात लागवड केली जात नाही. त्यामुळे ती बाजारात सहज उपलब्ध होत नाही. मात्र, यंदा रानावनातही करटुले पुरेशा प्रमाणात उपलब्ध नसल्याने बाजारातील आवक मोठ्या प्रमाणात घटली आहे.

यंदा जून महिन्याच्या सुरुवातीला पावसाचा खंड पडल्याचा परिणाम करटुल्याच्या नैसर्गिक वाढीवर झाला असावा, असा अंदाज कृषी क्षेत्रातील जाणकारांनी व्यक्त केला आहे.

एल निनोच्या प्रभावामुळे जून महिन्यात पावसाचा खंड पडला. रानभाज्यांना जमिनीतून रुजण्यासाठी जूनच्या सुरुवातीच्या पावसाची नितांत आवश्यकता असते. सुरुवातीला पुरेसे पाणी न मिळाल्याने करटुल्याच्या नैसर्गिक वाढीवर परिणाम झाला असावा. करटुले ही पावसाळ्यात निसर्गाने दिलेली एक संजीवनी आहे. चव आणि आरोग्याचा उत्तम समतोल साधणारी ही रानभाजी सर्वांनीच आपल्या आहारात समाविष्ट करायला हवी.

डी. सी. शिंदे, कृषी अधिकारी, भिवंडी तालुका

logo
marathi.freepressjournal.in