KDMC कडून दिलासा, करवाढ नाही; अर्थसंकल्प अंदाजपत्रक सादरीकरणाआधी राष्ट्रगीताचा विसर

अर्थसंकल्प अंदाजपत्रक सादरीकरणासाठी आयोजित केलेल्या सभेच्या आधी राष्ट्रगीत न घेतल्याने यावर शहरात चर्चा सुरू झाली आहे.
KDMC कडून दिलासा, करवाढ नाही; अर्थसंकल्प अंदाजपत्रक सादरीकरणाआधी राष्ट्रगीताचा विसर

डोंबिवली : कल्याण-डोंबिवली महापालिकेचे आयुक्त इंदुराणी जाखड यांनी मंगळवारी पालिकेचे ७०० कोटी वाढीचे बजेट सादर केले. या बजेटमध्ये कल्याण-डोंबिवलीकरांच्या करात वाढ झाली नाही. अर्थसंकल्प अंदाजपत्रक सादरीकरणासाठी आयोजित केलेल्या सभेच्या आधी राष्ट्रगीत न घेतल्याने यावर शहरात चर्चा सुरू झाली आहे.

कोणतीही कर-दर वाढ नसलेले पर्यावरणपूरक, समाजातील सर्व घटकांचे (दिव्यांग, विदयार्थी वर्ग, महिला वर्ग, जेष्ठ नागरीक इ.) हॅपीनेस इंडेक्स संवर्धित करणाऱ्या कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे रक्कम रु.२४९३.७१ कोटी जमा व रक्कम रु. १८४७.१७ कोटी खर्चाचे सन २०२३-२४ चे सुधारित अंदाजपत्रक आणि महापालिकेचे सन २०२४-२५ चे रक्कम रु.३१८२.५३ कोटी जमा व रक्कम रु. ३१८२.२८ कोटी खर्चाचे आणि रक्कम रु. २५ लक्ष शिल्लकेचे मुळ अंदाजपत्रक महापालिका आयुक्त व प्रशासक डॉ. इंदुराणी जाखड़ यांनी सादर करून त्यास मंजुरी दिली.

स्वमग्न मुलांसाठी मौजे बारावे येथे एक उद्यान उभारण्यात येणार असून, येथे ऑटीझम व्हीलेज उभारण्यात येणार आहेत. येथे स्वमग्न मुलांसाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची घोषणा अर्थ संकल्पात करण्यात आली आहे. भिवंडी, उल्हासनगर, कल्याण-डोंबिवली महापालिका, अंबरनाथ नगरपालिका आणि बदलापूर नगर परिषद अशा पाच पालिकेत एकात्मिक परिवहन योजना राबविण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी प्राथमिक मंजुरी देण्यात आली आहे. हा प्रस्ताव सामन्यांसाठी फायदेशीर असून, दरात देखील नक्कीच फरक पडेल. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या धर्तीवर हा संपूर्ण प्रकल्प राबविण्यात येणार आहेत. याचा आर्थिक भार देखील पाचही नगरपालिकेवर पडणार आहे. यामध्ये प्रत्येक पालिकेला तीन महापालिकांना १०० ई-बसेस देण्यात येणार आहेत. याव्यतिरिक्त कल्याण-डोंबिवलीच्या २०७ ई-बसेस अशा एकूण ५०७ ई बसेसचा यात समावेश आहे. विशेष म्हणजे, कल्याण डोंबिवली क्षेत्रात पुढील दहा दिवसात पाच ई- बसेस धावतील असे आयुक्तांनी सांगितले. तर चार्जिंग स्टेशन बांधण्याचे काम सुरू आहे. हिंदी भाषा भवन, वारकरी भवन आणि आगरी कोळी भवनही होणार असल्याचे सांगितले.

स्मशानभूमीचे विद्युतदाहिनीत रूपांतर करणार

पर्यावरणाचे समतोल राखण्यासाठी शहरातील लाकडांवर चालणाऱ्या स्मशानभूमीचे टप्प्याटप्प्याने 'विद्युतदाहिनीत' रूपांतर करण्यात येणार आहेत. यामुळे वृक्षतोडीला आळा बसून हवेतील प्रदूषण कमी होण्यास मदत होईल. येत्या वर्षात मृत प्राणिमात्रांच्या अंत्यविधीसाठी विद्युतदाहिनी उभारणे व त्याच्या आजुबाजूच्या परिसरात "मियावाकी" पद्धतीने हरितक्षेत्र उभारण्याचा महापालिकेचा मानस आहे.

दिव्यांगांसाठी १२ कोटींची तरतूद

डोंबिवली पश्चिम मोठा गाव ठाकुर्ली येथे रेल्वे फाटक आहे. त्याऐवजी उड्डाणपूल बांधणे, कोपरी उड्डाणपूल येथे समांतर पूल बांधण्याकरता नकाशे तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात करण्यात आले आहे. दिव्यांगांसाठी दिव्यांग कल्याण योजनेंतर्गत महापालिकेमार्फत दिव्यांगांसाठी मासिक पेन्शन व विविध उपक्रम राबविण्यासाठी १२ कोटींची तरतूद करण्यात आली आहे.

महिलांसाठी वसतिगृह

महिलांसाठी एक वसतिगृह उभारण्यात येणार असून, यासाठी ५० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. महापालिका शाळांमध्ये प्राथमिक शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी नीट, जेईई, या परीक्षेसाठी एमपीएससी आणि यूपीएससी अशा स्पर्धा परीक्षांसाठी महिलांना सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना सुरू करण्यासाठी तरतूद करण्यात आली आहे. आयुक्त इंदुराणी जाखड यांनी बचत गटाच्या महिलांतर्फे घरोघरी बिल पोहोचविण्यात येणार असल्याचे यावेळी सांगितले. उद्यान व वृक्ष संवर्धन विभगाकरिता १७.२१ कोटीची तरतूद करण्यात आली आहे. ही तरतूद गेल्यावर्षी पेक्षा १० कोटीने जास्त आहे. यामध्ये मियावाकी जंगलाची संकल्पना राबविण्यात येणार आहे.

सौरऊर्जा निर्मिती प्रकल्प

महापालिका मुख्यालय, गीता हरकिसनदास रुग्णालय, मा.बाळासाहेब ठाकरे स्मारक, गौरीपाडा लॅब, वसंत व्हॅली रुग्णालय शिक्षण मंडळ कार्यालय, अन्सारी रुग्णालय इ. ठिकाणी सौरऊर्जा निर्मिती प्रकल्प उभारण्याचे उद्दिष्ट असून, त्यातून २८६ कि.वॅट वीजनिर्मिती होणार आहे. नवीन इमारतींवर विकासकांकडून ४ मे.वॅट क्षमतेची सौरऊर्जा संयत्रे उभारण्याचा मानस आहे.

बेघर नागरिकांसाठी २ निवारा केंद्र

महापालिके अंतर्गत शहरातील निराधार/बेघर नागरिकांना सोयीसुविधा पुरविण्यासाठी २ निवारा केंद्र टिटवाळा व डोंबिवली येथे कार्यरत असून, त्यासाठी १ कोटीची तरतूद करण्यात आली आहे. तसेच ३रे निवारा केंद्र विठ्ठलवाडी येथे प्रस्तावित आहे. महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांच्यातील कला, क्रीडा इ. गुणांना वाव देण्याकरिता तज्ज्ञ मार्गदर्शन संस्था नेमण्यात येणार आहेत. महापालिका क्षेत्रातील ज्येष्ठ नागरिकांकरिता सोयीसुविधांसह ५० सन्मान कट्टे उभारण्याचे प्रस्तावित असून, त्यासाठी रु. ५० लाख तरतुद करण्यात आली आहे.

तृतीयपंथी नागरिकांसाठी विविध योजना

तृतीयपंथी नागरिकांसाठी विविध योजना प्रस्तावित असून, यासाठी ५० लाख तरतूद करण्यात आली आहे. मांडा-टिटवाळा आरक्षण क्रमांक ५४ या भूखंडावर हरितक्षेत्र विकसित करण्यात येणार असून, त्यामध्ये वयोवृद्ध नागरिकांच्या विरंगुळ्यासाठी सुविधा पुरविण्यात येणार आहेत. शहर सौंदर्यीकरण स्पर्धेत महापालिकेस प्राप्त झालेल्या पुरस्काराच्या रकमेमधून महापालिकेचे ५ उद्याने, प्रमुख इमारती, रुग्णालये इ. ठिकाणी सुशोभीकरण करण्यात येणार आहे. तसेच जीव्हीपी पॉईंट बंद करण्याचे दृष्टीने देखील सुशोभीकरण करण्यात येणार आहे.

तलाव सुशोभकरण व संवर्धन – रु. ४१ कोटी.

स्मशानभूमी व अंत्यविधी स्थाने - महसुली रु. ५ कोटी व भांडवली रु. २.५० कोटी.

नाट्यगृहे (रंगमंदिर)/क्रीडा केंद्राची व्यवस्था - रु. ९ कोटी.

उड्डाणपूल – रु. ३०.०० कोटी.

विद्युत व्यवस्था - महसुली रु. ३५ कोटी व भांडवली रु. १४ कोटी.

अग्निशमन – महसुली रु. ९ कोटी व भांडवली रु. २० कोटी.

शासन अनुदानांतर्गत विविध कामे - रु. ४४५ कोटी

रुग्णालये व दवाखाने - महसुली रु. २९.०५ कोटी.

सार्वजनिक स्वच्छता व‍ घनकचरा व्यवस्थापन – महसुली रु. १४७ कोटी व भांडवली रु. ८०.५० कोटी.

प्राथमिक शिक्षण - महसुली रु. ८१ कोटी व भांडवली रु. १.५० कोटी.

दुर्बल घटक, शहरी गरीब – रु. १५ कोटी महसुली व रु. ३४ कोटी भांडवली.

महिला व बालकल्याण कार्यक्रम – रु. १२.११ कोटी.

दिव्यांग कल्याण व पुनर्वसन कार्यक्रम – रु. १२.२५ कोटी.

क्रीडा व सांस्कृतिक – रु. २ कोटी.

परिवहन व्यवस्था - रु. ६६ कोटी.

पाणीपुरवठा - महसुली रु. १५४.३० कोटी व भांडवली रु. ४६१.४० कोटी.

जलनि:सारण व्यवस्था - महसुली रु. २.५० कोटी व भांडवली रु. ५ कोटी.

मलनि:सारण व्यवस्था - महसुली रु. ३७.१० कोटी व भांडवली रु. ४५ कोटी.

logo
marathi.freepressjournal.in