KDMC मध्ये खरा 'बॉस' भाजपच; स्ट्राइक रेटमध्ये सर्वात सरस!

कल्याण डोंबिवलीमध्ये मनसेला जवळ करत एकनाथ शिंदे यांचे पुत्र व खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी भाजपवर काही प्रमाणात कुरघोडी केल्याचे चित्र आहे. मात्र, निवडणूक निकालांकडे 'स्ट्राइक रेट'च्या दृष्टीने पाहिल्यास भारतीय जनता पक्षाची कामगिरी शिवसेनेपेक्षा अधिक सरस ठरल्याचे स्पष्ट होते.
KDMC मध्ये खरा 'बॉस' भाजपच; स्ट्राइक रेटमध्ये सर्वात सरस!
Published on

मुंबईलगतच्या ठाणे जिल्ह्यातील दुसऱ्या क्रमांकाची महत्त्वाची असलेली कल्याण-डोंबिवली महानगरपालिका (केडीएमसी) निवडणूक निकालानंतरही महापौरपद कोणाच्या वाट्याला जाणार, यावरून राजकीय वाद रंगताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर मनसेला जवळ करत एकनाथ शिंदे यांचे पुत्र व खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी भाजपवर काही प्रमाणात कुरघोडी केल्याचे चित्र आहे. मात्र, निवडणूक निकालांकडे ‘स्ट्राइक रेट’च्या दृष्टीने पाहिल्यास भारतीय जनता पक्षाची कामगिरी शिवसेनेपेक्षा अधिक सरस ठरल्याचे स्पष्ट होते.

खरेतर सुरुवातीला महायुतीत धुसफूस झाल्यानंतर केंद्रीय नेतृत्वाच्या निर्देशानुसार तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यात सविस्तर चर्चा होऊन कल्याण-डोंबिवलीची निवडणूक महायुती म्हणून लढवण्याचा निर्णय घेण्यात आला.

केडीएमसीमध्ये महायुतीच्या विजयाची लाट निर्विवाद असली तरी, आकडेवारी युतीतील खरे नेतृत्व कोणाचे आहे, हे स्पष्टपणे दाखवते. शिवसेनेने अधिक जागा लढवल्या असल्या तरी भाजपाने जागांची निवड, उमेदवारांची गुणवत्ता आणि प्रचाराचे अचूक नियोजन करत कमी उमेदवारांतूनही उत्कृष्ट निकाल दिला आहे. या कामगिरीची नोंद भाजपच्या केंद्रीय नेतृत्वानेही घेतल्याचे राजकीय जाणकार सांगतात.

स्ट्राइक रेटमध्ये सर्वात सरस !

महानगरपालिकेतील १२९ नगरसेवकांच्या जागांपैकी भाजपने ५४, तर शिवसेनेने ६५ जागा लढवल्या. भाजपने ५४ पैकी तब्बल ५० जागांवर विजय मिळवत ९२.६ टक्के इतका दणदणीत स्ट्राइक रेट साधला. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला ६५ पैकी ५३ जागांवर यश मिळाले असून सेनेचा स्ट्राइक रेट ८१.५ टक्के इतका राहिला.

सत्तासमीकरणांवर पुन्हा प्रश्नचिन्ह

भाजपने लढवलेल्या जागांपैकी शिवसेनेपेक्षा सुमारे दहा टक्के अधिक ठिकाणी विजय मिळवला, ही बाब दुर्लक्षित करता येणार नाही, असे स्थानिक भाजप नेते आवर्जून सांगत आहेत. डॉ. श्रीकांत शिंदे वारंवार महायुतीचाच महापौर होईल. असे सांगत असले तरी प्रत्यक्षात काही वेगळे राजकीय डावपेच रचले जात असल्याची शंका व्यक्त केली जात आहे. दरम्यान, गटस्थापनेच्या टप्प्यावर शिवसेनेने मनसेचे स्थानिक नेते व माजी आमदार राजू पाटील यांना सोबत घेत, मनसेच्या पाच नगरसेवकांचा पाठिंबा शिंदेसेनेसाठी मिळवल्याने सत्तासमीकरणांवर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

सत्तेपेक्षा युतीधर्माला अधिक महत्त्व

अधिक कार्यक्षमता, सक्षम उमेदवार, उपलब्ध संसाधनांचा प्रभावी वापर आणि मतदारांशी असलेली मजबूत नाळ यामुळे भाजपने घवघवीत यश संपादन केल्याचे या निकालातून स्पष्ट होते. जाणकारांच्या मते, स्ट्राईक रेटच्या निकषावर पाहता कल्याण-डोंबिवलीतील ‘खरा बिग बॉस’ कोण, हे आता लपून राहिलेले नाही. भाजपने स्वबळावर निवडणूक लढवली असती, तर स्पष्ट बहुमत मिळाले असते; मात्र युतीधर्म पाळण्यात आला. त्यामुळे जवळपास समान संख्येने जागा मिळवलेल्या भाजपाला केडीएमसीच्या सत्तेत तितकाच ठोस व निर्णायक वाटा मिळणे, हे नैसर्गिक न्यायाच्या दृष्टीनेही योग्य ठरेल.

logo
marathi.freepressjournal.in