
डोंबिवली : डोंबिवलीतील ६५ वादग्रस्त इमारतींपैकी ५४ इमारतींना कल्याण-डोंबिवली महापालिकेने पुन्हा नोटिसा बजावण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे या इमारतींमध्ये राहणाऱ्या हजारो नागरिकांवर पुन्हा बेघर होण्याची टांगती तलवार लटकली आहे. आपला संसार उघड्यावर येणार या भीतीने अनेक रहिवासी चिंतेत असल्याचे दिसून आले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वी विधानसभेत स्पष्ट आश्वासन दिले होते की, ‘या इमारतींतील रहिवाशांना बेघर होऊ देणार नाही’ मात्र आता पुन्हा नोटिसा आल्याने रहिवाशांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.
पालिकेच्या नोटिसांमध्ये स्पष्ट इशारा दिला आहे की इमारती लवकर रिकाम्या करा, अन्यथा पोलीस बंदोबस्तात कारवाई केली जाईल. याआधी १७ नोव्हेंबर रोजी न्यायालयाने या इमारती निष्कासित करण्याचे आदेश दिले होते. त्या आदेशाच्या आधारावर पालिकेने ही कारवाई सुरू केली आहे.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी सभागृहात दिलेल्या आश्वासनाची प्रशासनाने दखल घ्यावी व नोटिसा परत घ्याव्यात. नागरिकांना दिलासा मिळाला नाही, तर आम्ही नागरिकांसह मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहोत. ६५ इमारतींतील सर्व रहिवाशांच्या पाठीशी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष खंबीरपणे उभा आहे. - दीपेश म्हात्रे, जिल्हाप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष