केडीएमसीचे दोन कर्मचारी निलंबित; फेरीवाला निर्मूलन मोहिमेत हलगर्जी भोवली

डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानकाबाहेरील अनधिकृत फेरीवाल्यांवर प्रभावी कारवाई करण्यात हलगर्जीपणा केल्याप्रकरणी कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या ‘ग’ प्रभागातील दोन कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. ‘ग’ प्रभागाचे सहाय्यक आयुक्त जयराम शिंदे यांनी ही कारवाई केली.
केडीएमसीचे दोन कर्मचारी निलंबित; फेरीवाला निर्मूलन मोहिमेत हलगर्जी भोवली
केडीएमसीचे दोन कर्मचारी निलंबित; फेरीवाला निर्मूलन मोहिमेत हलगर्जी भोवली
Published on

डोंबिवली : डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानकाबाहेरील अनधिकृत फेरीवाल्यांवर प्रभावी कारवाई करण्यात हलगर्जीपणा केल्याप्रकरणी कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या ‘ग’ प्रभागातील दोन कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. ‘ग’ प्रभागाचे सहाय्यक आयुक्त जयराम शिंदे यांनी ही कारवाई केली. निलंबित कर्मचाऱ्यांमध्ये कमलाकर सोनवणे आणि रवी बर्वे यांचा समावेश आहे.

महापौर ॲड. हर्षाली चौधरी आणि आयुक्त अभिनव गोयल यांनी शहरातील अनधिकृत फेरीवाले हटविण्यासाठी सर्व प्रभागांच्या सहाय्यक आयुक्तांना कठोर कारवाईचे निर्देश दिले होते. त्यानुसार विशेष पथकेही नियुक्त करण्यात आली होती. मात्र, डोंबिवली पूर्व स्थानकाबाहेरील ‘ग’ प्रभागाच्या हद्दीत फेरीवाल्यांवर अपेक्षित कारवाई होत नसल्याचे निदर्शनास आल्यानंतर संबंधित कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली.

यापूर्वी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत उपमहापौर राहुल दामले यांनीही फेरीवाला निर्मूलन मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याबद्दल नाराजी व्यक्त केली होती. अधिकारी कारवाईचे आदेश देतात, मात्र कर्मचारी त्याची प्रभावी अंमलबजावणी करत नाहीत. फेरीवाल्यांच्या प्रश्नावर प्रशासनाने अधिक ठोस पावले उचलण्याची गरज आहे, असे त्यांनी म्हटले होते.

दरम्यान, पालिकेचे उपायुक्त प्रसाद बोरकर यांनी मे महिन्यात डोंबिवली पूर्व स्थानक परिसराची पाहणी केली होती. त्यावेळी परिसर पूर्णपणे फेरीवालामुक्त नसल्याचे स्पष्ट झाले होते. त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने प्रभावी कारवाईचे आदेश दिले होते. मात्र, त्यानंतरही परिस्थितीत अपेक्षित सुधारणा न झाल्याने अखेर दोन कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली. यापुढेही कामात हलगर्जीपणा करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा सहाय्यक आयुक्त जयराम शिंदे यांनी दिला.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in