कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या नगररचना विभागात काम करणाऱ्या दोन जणांना बाजारपेठ पोलिसांनी शुक्रवारी अटक केली आहे. बाळू बहिराम आणि राजेश बागुल अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. या घटनेनंतर कल्याण- डोंबिवली महापालिकेचा नगररचना विभाग पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
कल्याण- डोंबिवली महापालिका हद्दीतील डोंबिवली पश्चिमेतील गावदेवी परिसरात एका बिल्डरने एका इमारत तयार केली होती. या इमारतीसाठी लागणाऱ्या परवानगीकरिता बनावट नकाशा तयार केला होता. या प्रकरणाची तक्रार स्वत: केडीएमसीकडून करण्यात आली. कल्याणच्या बाजारपेठ पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला. या प्रकरणाच्या चौकशीकरिता संबंधित दोन अधिकाऱ्यांना बोलाविले होते मात्र ते हजर झाले नाही. अखेर या दोघांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात सर्वेअर बाळू बहिराम आणि ड्राफ्टमन राजेश बागूल यांना अटक झाली आहे. नगररचनाकार, सहाय्यक नगररचनाकार हे देखील अडकण्याची शक्यता पोलीस सुत्रांनी व्यक्त केली आहे. या दोघांना कल्याण न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे.
केडीएमसी नगररचना विभागात अनेक अधिकारी, कर्मचारी गेल्या अनेक वर्षांपासून एकाच पदावर कार्यरत आहेत. जरी बदली झाली तरी संबंधित अधिकारी तीन ते चार महिन्यात पुन्हा नगररचना विभागात कार्यरत होत असल्याचे अनेकदा दिसून आले आहे. नगररचना विभागातील दोन सर्वेअरना कागदपत्रांमध्ये खाडाखोड करत बनावट कागदपत्रांच्या आधारे केडीएमसीची फसवणूक केल्याप्रकरणी बाजारपेठ पोलिसांनी अटक केल्यानंतर नगररचना विभागातील सावळा गोंधळ पुन्हा एकदा उजेडात आला आहे. या प्रकरणात मोठे अधिकारी देखील अडचणीत येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.