केळकर -नाईक यांना मंत्रिपदाची पुन्हा हुलकावणी; रवींद्र चव्हाण जिल्ह्याचे नवे पालकमंत्री असण्याची शक्यता

मुळातच मंत्रिपदाच्या बाबतीत ठाणे जिल्ह्याला आघाडीच्या कार्यकाळात विशेष अशी संधी मिळालेली नाही
केळकर -नाईक यांना मंत्रिपदाची पुन्हा हुलकावणी; रवींद्र चव्हाण जिल्ह्याचे नवे पालकमंत्री असण्याची शक्यता

राष्ट्रवादीतून २०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये गेलेले गणेश नाईक तसेच ठाण्याच्या गडामध्ये सलग दुसऱ्यांदा विजय मिळवणाऱ्या संजय केळकर तर शिंदे गटाचे कट्टर समर्थक प्रताप सरनाईक यांची मंत्रिमंडळात वर्णी लागण्याची ठाणेकरांना आशा होती, मात्र नाईक, केळकर आणि सरनाईक यांचा मंत्रिमंडळात समावेश झालेला नाही. महापालिका निवडणुका तोंडावर आलेल्या असतांना पक्ष संघठनेला बळ देण्यासाठी मंत्रिमंडळात गणेश नाईक आणि संजय केळकर यांची मंत्रिपदावर वर्णी लागणार अशी अटकळ बांधण्यात येत होती. मात्र या दोघांना वगळून डोंबिवलीच्या रवींद्र चव्हाण यांना पसंती देण्यात आल्याने तेच जिल्ह्याचे पालकमंत्री असतील असेही उघड होऊ लागले आहे.

मुळातच मंत्रिपदाच्या बाबतीत ठाणे जिल्ह्याला आघाडीच्या कार्यकाळात विशेष अशी संधी मिळालेली नाही. एखादे कॅबीनेट मंत्रिपद वा एखादे राज्यमंत्रीपद मिळण्याव्यतिरीक्त या जिल्ह्याच्या पदरी यापूर्वी काही विशेष आलेले नाही, नाही म्हणायला शिवसेना भाजप युतीच्या १९९५ च्या सरकारमध्ये नवी मुंबईचे गणेश नाईक, अंबरनाथचे साबीर शेख, डोंबिवलीचे जग्गनाथ पाटील आणि काही काळ विक्रमगडचे विष्णू सावरा या चार दिग्गजांना कॅबिनेट मंत्रिपदाची लॉटरी लागली होती. परंतू त्यानंतरच्या कॉंग्रेस राष्ट्रवादी आघाडीच्या पहिल्या पाच वर्षाच्या कार्यकाळात एकमेव गणेश नाईक यांना कॅबीनेट दर्जाचे मंत्रिपद मिळाले होते. तर पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री होताच राजेंद्र गावित या पालघरच्या एकमेव कॉंग्रेस आमदाराला राज्यमंत्रीपद देण्यात आले होते. तर आघाडी सरकारचा अवघा चार महिन्याचा कार्यकाळ शिल्लक असतांना राष्ट्रवादीच्या जितेंद्र आव्हाड यांना वैद्यकीय शिक्षण मंत्रिपदाची संधी मिळाली होती. विशेष म्हणजे त्यांच्या रुपाने ठाणे शहराला पहिल्यांदा कॅबिनेट मंत्रिपदाचा मान मिळाला होता. तर २०१५च्या मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख आणि कोपरी पाचपाखाडीचे आमदार एकनाथ शिंदे यांचा कॅबिनेटमंत्री म्हणून शपथविधी झाला आणि सहा महिन्यात दुसऱ्यांदा राज्याचे कॅबिनेट मंत्रिपद ठाणे शहराला मिळाले होते.

२०१९ च्या महाविकास आघाडी सरकारमध्ये एकनाथ शिंदे हे क्रमांक २ चे मंत्री होते. राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना महत्वाचे गृहनिर्माणमंत्रिपद मिळाले होते. त्यामुळे अडीज वर्षाहून अधिक काळ ठाणे शहरात दोन महत्वाचे मंत्री होते. आता एकनाथ शिंदे हे राज्याचे मुख्यमंत्री आहेत मात्र ठाणे आणि नवी मुंबईतून एकही आमदाराला मंत्रिपद मिळालेले नाही.

दरम्यान आगामी महापालिका निवडणूक लक्षात घेता स्वच्छ चारित्र्याच्या संजय केळकर आणि नवी मुंबईतून गणेश नाईक यांना मंत्रिपद बहाल करण्यात येईल अशी सर्वाना अपेक्षा होती. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपद स्वीकारल्यापासून त्यांच्या गटाची घौडदौड सुरू असून अंबरनाथ, बदलापूर नगरपालिका पाठोपाठ ठाणे, कल्याण डोंबिवली महापालिका यातील बहुतांशी माजी नगरसेवकांनी शिंदे गटाला आपले समर्थन जाहीर केले आहे.

संजय केळकर यांच्याकडे पुन्हा दुर्लक्ष

कधी काळी ठाणे जिल्ह्यात प्रभावी असलेल्या भाजपची आजची अवस्था केविलवाणी झाली आहे. कल्याणा - डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर, ठाणे या हक्काच्या गडात भाजपचे बळ वाढले. शिवसेनेपेक्षा जास्त जागा काही ते मिळवू शकले नाहीत. राष्ट्रवादीतून आलेल्या कपिल पाटील यांना विभागीय अध्यक्ष ते थेट केंद्रीय मंत्रिपद देण्यात आले. मात्र यापूर्वीही राज्यात भाजपची सत्ता असतांना स्वच्छ चारित्र्याच्या संजय केळकर यांना मंत्रिमंडळात स्थान दिले गेले नव्हते. दरम्यान महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर असताना संजय केळकर यांच्यावर जन आशीर्वाद यात्रेची जबाबदारी सोपवण्यात आली होती. तसेच देवेंद्र फडणवीस यांनी ठाण्यात येऊन केळकर यांच्या सामाजिक कार्याची तोंडभरून स्थुती केली होती. मात्र जेव्हा सत्तेतील महत्वाची पदे देण्याची वेळ येते तेव्हा त्यांच्याकडे दुर्लक्ष केले जाते हे पुन्हा एकदा उघड झाले आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in