ठाण्यातील गरोदर मातांसाठी 'किलकारी' योजना; RCH पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन

सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण विभागातर्फे गरोदर महिलांच्या व एक वर्षापर्यंतच्या बालकांच्या सुरक्षेसाठी 'किलकारी' ही नवीन योजना आणि आशा सेविकांसाठी मोबाईल अकादमी ठाणे जिल्ह्यात सुरू करण्यात आली आहे.
गरोदर महिला आणि त्यांच्या बाळाच्या आरोग्यासाठी मासे फायदेशीर ठरू शकते.
गरोदर महिला आणि त्यांच्या बाळाच्या आरोग्यासाठी मासे फायदेशीर ठरू शकते.PM

ठाणे : सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण विभागातर्फे गरोदर महिलांच्या व एक वर्षापर्यंतच्या बालकांच्या सुरक्षेसाठी 'किलकारी' ही नवीन योजना आणि आशा सेविकांसाठी मोबाईल अकादमी ठाणे जिल्ह्यात सुरू करण्यात आली आहे. महिला व बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी आरोग्य यंत्रणेमार्फत विविध उपक्रम राबविण्यात येत आहे.

जिल्हा परिषद ठाणे अंतर्गत ग्रामीण भागात देखील 'किलकारी' या नवीन योजनेची अंमलबजावणी करण्यात आली असून गर्भवती महिलेला गावातील आरोग्यसेविकाद्वारे Reproductive and Child Health (आर.सी.एच) पोर्टलवर नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे यांनी केले आहे.

‘किलकारी’ योजना केंद्रीकृत संवादात्मक ध्वनी प्रतिसाद (आयव्हीआर) आधारित मोबाईल आरोग्यसेवा आहे. गर्भधारणा, बाळंतपण आणि बाल संगोपनविषयक ७२ श्राव्य संदेश थेट कुटुंबांच्या नोंदणीकृत भ्रमणध्वनीवर गर्भधारणेच्या दुसऱ्या तिमाहीपासून मूल एक वर्षाचे होईपर्यंत आई व बाळाचे आरोग्य सुदृढ ठेवण्यासाठी मोफत, साप्ताहिक रेकॉर्डेड ऑडियो कॉल करण्यात येत आहे. ऑडियो कॉल चुकल्यास किंवा त्या आठवड्यातील ऑडियो कॉल पुन्हा ऐकायचा असल्यास नोंदणीकृत १४४२३ या मोबाईल क्रमांकाद्वारे संपर्क करता येणार आहे. गरोदर महिलांचे स्वत: वापरत असलेल्या मोबाईलद्वारेच नोंदणी करण्यात यावी अशी माहिती जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी डॉ. स्वाती पाटील यांनी दिली आहे.

१ हजार १२३ आशा सेविकांना ऑनलाईन प्रशिक्षण

एप्रिल व मे महिन्यातील आकडेवारीनुसार ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात ६ हजार ४१८ व शहरी भागात २१ हजार ६२० गर्भवती महिलांची नोंद आहे. ठाणे जिल्ह्यातील १ हजार १२३ आशा सेविकांना त्यांच्या कामात उपयुक्त ठरणारे ऑनलाईन प्रशिक्षण दिले आहे. त्याच धर्तीवर आशा सेविकांसाठी नोंदणीकृत १४,४२९ दूरध्वनी क्रमांक उपलब्ध करून देण्यात आले आहे. तसेच किलकारी सेवा देण्यासाठी येणारा दूरध्वनी क्रमांक ०१२४-४४५१६६० आहे.

logo
marathi.freepressjournal.in