बदलापूर : आगामी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बदलापुरात राजकीय समीकरणे जलदगतीने बदलताना दिसत आहेत. महायुतीतील भाजप आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची युती अधिकृतरित्या निश्चित झाली असताना, शिंदे गटाची शिवसेना स्वबळावर लढण्याच्या तयारीत असल्याचे संकेत आहेत. याच पार्श्वभूमीवर आमदार किसन कथोरे यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, "महायुती व्हावी, पण नगराध्यक्ष भाजपचाच असला पाहिजे."
आमदार किसन कथोरे यांच्या जनसंपर्क कार्यालयात भाजप पदाधिकारी नियुक्ती कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात बोलताना कथोरे यांनी शिवसेनेला उद्देशून अप्रत्यक्षपणे महायुतीत सहभागी होण्याचा प्रस्ताव मांडला. ते म्हणाले, राज्यात आणि केंद्रात भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी आणि आरपीआय यांची महायुती सत्तेत आहे. बदलापुरात आम्हाला शिवसेनेला विरोध नाही. पण कुणाचा 'इगो' असेल तर तो अजिबात चालणार नाही. काही लोकांना इगो झालाय, तो त्यांनी डोक्यातून काढला तर आमचा हात पुढे आहे. कथोरे यांच्या या वक्तव्याने स्थानिक राजकारणात नव्या चर्चांना उधाण आले आहे.
शिंदे गटाकडे लक्ष
शिंदे गटाने 'अबकी बार चाळीस पार' या घोषवाक्याने मोर्चेबांधणी सुरू केली आहे, तर दुसरीकडे महायुतीतील भाजप आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) यांची युती झाल्याने भाजप-शिवसेना एकत्र येण्याची शक्यता क्षीण झाली असल्याचे राजकीय वर्तुळात म्हटले जात आहे. मात्र, कथोरे यांनी 'नगराध्यक्ष भाजपचाच असावा' अशी भूमिका घेतल्यामुळे आता शिवसेना शिंदे गट यावर काय प्रतिक्रिया देतो, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.