
उल्हासनगर : "मी सिंधी असल्यामुळेच मला त्रास दिला जात आहे," असे विधान भाजप आमदार कुमार आयलानी यांनी सोशल मीडियावर केल्यानंतर भाजपात अंतर्गत वाद उफाळून आला आहे. या वक्तव्यामुळे संतप्त झालेले भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष प्रदीप रामचंदानी यांनी थेट आमदार आयलानी यांना "उल्हासनगरातील सर्व मतदारांची माफी मागा अन्यथा आमदारकीचा राजीनामा द्या" अशी मागणी केली आहे. या प्रकारामुळे उल्हासनगर भाजपमध्ये अंतर्गत नाराजी उफाळून आली असून पक्षातील फाटाफूट चव्हाट्यावर आली आहे.
भाजप आमदार कुमार आयलानी सध्या शहाड परिसरात उल्हास नदीच्या काठावर सुरू असलेल्या घाट बांधकामाच्या वादात अडकले आहेत. याच पार्श्वभूमीवर संतप्त झालेल्या आमदार कुमार आयलानी यांनी सोशल मीडियावर आपली नाराजी व्यक्त करत, "मी सिंधी असल्यानेच माझ्या विरोधात कारवाई होते आहे. एखादा मराठी आमदार असता, तर त्याच्याविरुद्ध बोलण्याची हिंमत झाली असती का?" असा प्रश्न उपस्थित करत विरोधकांवर निशाणा साधला.
मात्र त्यांच्या या वक्तव्याचा जोरदार प्रतिवाद करत भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष प्रदीप रामचंदानी यांनी आयलानी यांना घरचा आहेर दिला. ते म्हणाले, "कुमार आयलानी यांना केवळ सिंधी मतदारांनी नव्हे, तर सर्व समाजातील नागरिकांनी निवडून दिले आहे. त्यामुळे अशा विभाजनवादी वक्तव्याने उल्हासनगरातील समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न न करता त्यांनी त्वरित जनतेची माफी मागावी."
आयलानी यांना सर्वच समाजातील मते मिळाल्याचे पक्ष कार्यकर्ते सांगतात. या आरोप-प्रत्यारोपामुळे सध्या उल्हासनगरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून भाजपामध्ये अंतर्गत मतभेद समोर आले आहेत. विशेषतः निवडणुकीपूर्वीच पक्षातील नेत्यांमध्ये अशी उघड नाराजी दिसून येत असल्याने आगामी राजकीय समीकरणांवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
प्रकरण काय?
शहाड परिसरात उल्हास नदीच्या काठावर रिजेन्सी अंटॅलिया कॉम्प्लेक्सजवळ सरकारी निधीतून घाट बांधण्याचे काम सुरू केले जात आहे. या कामाबाबत हिराली फाउंडेशनच्या अध्यक्षा सरिता खानचंदानी यांनी लघुपाटबंधारे विभागाकडे तक्रार दाखल केली होती. विभागाच्या पाहणीनंतर बांधकाम नदी पात्रात सुरू असल्याचे स्पष्ट होताच अधिकाऱ्यांनी बांधकाम पाडण्याची नोटीस बजावली आहे. याच पार्श्वभूमीवर संतप्त झालेल्या आमदार कुमार आयलानी यांनी सोशल मीडियावर आपली नाराजी व्यक्त केली.