ठाण्यात चार्जिंग स्टेशनचा अभाव; ठाणेकरांचा इलेक्ट्रिक वाहनांना थंड प्रतिसाद

ठाणे शहरात चार्जिंग स्टेशनची संख्या अपुरी असल्याने ठाणेकर नागरिकांचा सध्या इलेक्ट्रिक वाहन धोरणाला पुरेसा प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.
ठाण्यात चार्जिंग स्टेशनचा अभाव; ठाणेकरांचा इलेक्ट्रिक वाहनांना थंड प्रतिसाद
प्रातिनिधिक छायाचित्र
Published on

ठाणे : ठाणे शहरात चार्जिंग स्टेशनची संख्या अपुरी असल्याने ठाणेकर नागरिकांचा सध्या इलेक्ट्रिक वाहन धोरणाला पुरेसा प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. हवेतील प्रदूषण कमी व्हावे, यासाठी रस्त्यावर जास्तीत जास्त ई-वाहने धावण्याच्या दृष्टीने शहरात तब्बल १०० ठिकाणी चार्जिंग स्टेशन उभारण्याचा प्रस्ताव ठाणे महापालिकेने तयार केले होता. मात्र गेल्या चार वर्षांपासून हा प्रस्ताव आजपर्यंत कागदावरच आहे.

शहरात चार्जिंग स्टेशनच उपलब्ध नसल्याने ई-वाहने घेऊन करणार काय? असा प्रश्न ठाणेकारांना पडला आहे. परिणामी ठाणे प्रादेशिक परिवहन विभागाकडे नोंदणी झालेल्या १ लाखापेक्षा अधिक नवीन वाहनांपैकी केवळ ४ हजार ई-वाहनांची खरेदी करण्याला ठाणेकरांनी पसंती दिल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.

देशभरात २०३०पर्यंत विजेवरील वाहनांची वाहतूक सुरू करण्याचे धोरण केंद्र शासनाने आखले असून त्याचाच एक भाग म्हणून ठाणे महापालिकेचे तत्कालीन आयुक्त संजीव जयस्वाल यांनी शहरात अशा वाहनांसाठी चार्जिंग स्टेशन उभारण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयानुसार महापालिकेच्या निधीतून शहरात १०० चार्जिंग स्टेशन उभारण्यात येणार होती. मात्र हे चार्जिंग स्टेशन कोणत्या ठिकाणी उभारणार याबाबत पालिकास्तरावर अद्याप अस्पष्टता आहे. महिंद्रा आणि कायनेटिक ग्रीन या कंपन्यांनी स्टेशन उभारणीचा खर्च उचलण्याची तयारी दर्शविली होती. त्यामुळे महापालिका निधीतून चार्जिंग स्टेशन उभारण्याचा प्रस्ताव प्रशासनाने गुंडाळला आणि संबंधित कंपन्यांना चार्जिंग स्टेशन उभारणीसाठी केवळ जागा उपलब्ध करून देण्याचे पालिकेने निश्चित केले होते. याशिवाय, संबंधित कंपन्यांच्या माध्यमातून शहरात विजेवरील वाहन उपलब्ध करून देणे आणि त्यासाठी कर्ज पुरवठा करणाऱ्या वित्तीय संस्थांशी समन्वय साधण्याचे कामही महापालिका करणार होती. यासंबंधीच्या सामंजस्य करारावरही संबंधित कंपन्यांच्या प्रतिनिधींनी नोव्हेंबर २०१८ रोजी स्वाक्षऱ्या देखील केल्या होत्या.

त्यानंतर जानेवारी २०१९ पर्यंत या प्रकल्पाची अंमलबजावणी केली जाईल, असा दावा देखील पालिकेने केला होता. त्यानुसार शहराच्या विविध भागात चार्जिंग स्टेशन उभारण्यासाठी शोधमोहीम हाती घेण्यात आली होती. मात्र चार वर्षे उलटूनही हा प्रस्ताव कागदावरच असून टेंडर प्रक्रियेत हा प्रस्ताव अडकला असल्याची माहिती पालिका प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे. चार्जिंग स्टेशनच उपलब्ध नसतील. तर ई-वाहने घेणार कशी? असा प्रश्न ठाणेकरांना पडला आहे.

१ लाखापैकी केवळ ४ हजार ई-वाहनांची नोंद

मागील वर्षी ठाणे प्रादेशिक परिवहन विभागात १ लाख २६ हजार ९५९ नवीन वाहनांची नोंद झाली. मात्र यातील केवळ ३ हजार १७६ वाहने ही इलेक्ट्रिक आहेत. ठाणे शहरात इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशनची पुरेशी अशी व्यवस्था नाही. यामुळे ठाणेकरांची अजूनही डिझेल आणि पेट्रोल वाहने खरेदी करण्यालाच पसंती असल्याचे उघड झाले आहे. ठाणे प्रादेशिक परिवहन कार्यालयात नोंद झालेल्या वाहनांच्या आकडेवारीनुसार सर्वाधिक ८२ हजार ८५६ दुचाकींची नोंदणी झाली आहे, तर २३ हजार ८९ इतर वाहनांचा समावेश आहे. यात केवळ ३ हजार १७६ इलेक्ट्रिक वाहनांचा समावेश आहेत. प्रदूषण कमी करण्यासाठी इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढवण्याच्या दृष्टीने ठाणे महापालिकेने प्रयत्न सुरू केले आहेत.

logo
marathi.freepressjournal.in