ठाणे परिवहनचे चाक समस्यांच्या गाळात; कर्मचाऱ्यांअभावी डोलारा कोसळणार

टीएमटीच्या ताफ्यातील जुन्या ९४ बसेस वाहक उपलब्ध नसल्याने आगारात खितपत पडल्याचे समोर आले आहे. यातील १७ बसेस तर पुरत्या भंगारात गेल्या असल्याची कबुली टीएमटी प्रशासनाने दिली आहे.
ठाणे परिवहनचे चाक समस्यांच्या गाळात; कर्मचाऱ्यांअभावी डोलारा कोसळणार

ठाणे : टीएमटीच्या ताफ्यातील जुन्या ९४ बसेस वाहक उपलब्ध नसल्याने आगारात खितपत पडल्याचे समोर आले आहे. यातील १७ बसेस तर पुरत्या भंगारात गेल्या असल्याची कबुली टीएमटी प्रशासनाने दिली आहे. ठाणे महापालिकेचा परिवहन उपक्रम (टीएमटी) अक्षरशः गाळात रुतली असून महापालिकेच्या अनुदानावरच परिवहनचा डोलारा उभा आहे.

ठाणे महापालिका परिवहन उपक्रमाने मागील वर्षी २०२३-२४ या आर्थिक वर्षाकरिता ४२७ कोटी १९ लाख रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला होता. तर २०२४-२५ या आर्थिक वर्षाकरीता ७१८ कोटी ७४ लाख इतक्या अर्थसंकल्पाला ठाणे मनपा प्रशासनाने मंजुरी दिली. यात पहिल्या टप्प्यात २६० कोटी अनुदानाची तरतूद पालिकेने केली आहे. या अनुषंगाने टीएमटीची सेवा प्रवासी स्नेही करण्याच्या हेतूलाच हरताळ फासल्याचे दिसून येत आहे. टीएमटीच्या ताफ्यात सद्यस्थितीत एकूण ५४६ बसेस असून यातील ९४ जुन्या बसेस टीएमटीच्या मालकीच्या तर, ११५ एसी, ११० स्टँडर्ड, ९० मिडी बसेस, ‘जेएनयूआरएम’मधील नवीन आणि जुन्या ४५ बसेस, ५० महिला तेजस्विनी बसेस अशा एकूण ४१० बसेस भाडेतत्त्वावर आहेत. मागील काही काळात टीएमटीमधील अनेक कायम कर्मचारी सेवानिवृत्त झाले आहेत. त्यामुळे, वाहकांचा तुटवडा भासत असून वाहक उपलब्ध नसल्याने ९४ जुन्या बसेस आगारात खितपत पडल्या आहेत. यातील १७ बसेस उभ्या उभ्याच भंगारात जमा झाल्या आहेत.

सवलतींमुळे प्रतिवर्षी १८ कोटींचा फटका

ठाणे परिवहन सेवेचे चाक आधीच खोलात आहे. त्यातून सावरण्यासाठी ठाणे परिवहन सेवेकडून विविध उपाययोजना आखल्या जात असताना ठाणे पालिका क्षेत्रातील ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना मोफत, तर महिलांना प्रवासात ५० टक्के सूट देण्यात येत असल्याने उत्पन्नात प्रतिदिन ५ लाख असे प्रतिवर्षी १८ कोटींचा फटका बसत आहे. ही सूट लागू होण्यापूर्वी ठाणे परिवहन सेवेचे दिवसाचे उत्पन्न ३० ते ३१ लाखांच्या आसपास होते, ते निम्यावर आले आहे.

logo
marathi.freepressjournal.in