आंदोलकांसाठी वकील संघटना मैदानात; आरोपी अक्षय शिंदेचे वकीलपत्र न घेण्याचा निर्णय

Badlapur Minors Sexual Abuse Case: उल्हासनगर, बदलापूर आणि कल्याण येथील वकिलांनी सामाजिक बांधिलकी जपत, या आंदोलकांच्या बाजूने मोफत न्यायालयीन लढाई लढण्याचा निर्णय घेतला आहे.
आंदोलकांसाठी वकील संघटना मैदानात; आरोपी अक्षय शिंदेचे वकीलपत्र न घेण्याचा निर्णय
Published on

उल्हासनगर : बदलापुरातील एका गंभीर लैंगिक अत्याचार प्रकरणामुळे शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणातील आरोपीला अटक करण्यात आली असली, तरी संतप्त नागरिकांनी आपल्या न्यायाच्या मागणीसाठी रस्त्यावर उतरून आंदोलनाचा मार्ग अवलंबला. या घटनेच्या पार्श्वभूमीवर उल्हासनगर, बदलापूर आणि कल्याण येथील वकिलांनी सामाजिक बांधिलकी जपत, या आंदोलकांच्या बाजूने मोफत न्यायालयीन लढाई लढण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे न्यायासाठी लढणाऱ्या नागरिकांना वकिलांकडून मोठा आधार मिळणार आहे.

नागरिकांच्या रोषामुळे बदलापूर शहरात मंगळवारी "बदलापूर बंद"चे आवाहन करण्यात आले होते. मात्र या "बदलापूर बंद"ने उग्र रूप धारण केले. शांततेत सुरू झालेले हे आंदोलन हळूहळू अधिक तीव्र झाले, ज्यामुळे पोलिसांनी काही आंदोलकांना अटक केली आणि सुमारे ३०० हून अधिक आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

या कठीण परिस्थितीत उल्हासनगर, बदलापूर आणि कल्याण येथील वकील संघटनानी सामाजिक बांधिलकीचा आदर्श उभा केला आहे. त्यांनी निर्णय घेतला आहे की, ते आंदोलकांची बाजू न्यायालयात मोफत मांडणार आहेत. वकील संस्थांनी त्यांच्या सामाजिक जबाबदारीचे भान राखत, या आंदोलनाच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचे वचन दिले आहे. तसेच, कोणीही आरोपी अक्षय शिंदे यांचे वकीलपत्र घेऊ नये, असे आवाहन ॲडव्होकेट संजय सोनावणे, उमेश केदार, वैशाली बनसोडे, प्रवीण अटकळे, कल्पेश माने, निखिल शिंदे, प्रियेश जाधव, महेश माळवे यांच्यासह इतर वकिलांनी केले आहे. या घटनेचा निषेध म्हणून सर्व वकिलांनी उल्हासनगर न्यायालयात लालपट्टी हातावर बांधून आपला रोष व्यक्त केला.

बदलापूर घटनेचे पडसाद

बदलापूर येथील एका नामांकित शाळेत दोन मुलींवर अत्याचार झाल्याची घटना घडल्यानंतर पोलीस प्रशासन आणि शाळा प्रशासनाविरोधात बदलापूरकरांनी मंगळवारी आंदोलन केले. हे आंदोलन काही काळानंतर चिघळले आणि त्याचे पडसाद बुधवारी देखील सगळीकडे उमटले.

logo
marathi.freepressjournal.in