कर्जत तालुक्यात बिबट्याचा वावर

कर्जत तालुक्यातील वन विभागाच्या आंबिवली वनपाल क्षेत्रात बिबट्याचा वावर पुन्हा सुरू झाला. हिऱ्याची वाडी या आदिवासी वाडी मधील शेतकऱ्यांचे वासरू बिबट्याने खाल्ले आहे.
कर्जत तालुक्यात बिबट्याचा वावर

कर्जत : कर्जत तालुक्यातील वन विभागाच्या आंबिवली वनपाल क्षेत्रात बिबट्याचा वावर पुन्हा सुरू झाला. हिऱ्याची वाडी या आदिवासी वाडी मधील शेतकऱ्यांचे वासरू बिबट्याने खाल्ले आहे. जंगलाला हिऱ्याचीवाडी चे आसपास हिंस्त्र प्राण्यांची सतत दहशत असते. त्यामुळे बिबट्याच्या हल्ल्यात गुरांचा मृत्यू होण्याचे प्रमाण दरवर्षी वाढते आहे. या वर्षात नेरळ जवळील जुम्मापट्टी, बेकरे आणि धसवाडी भागातील जनावरांवर बिबट्याने हल्ले केले आहेत.

तालुक्यातील आंबिवली जवळील हिऱ्याचीवाडी येथील आदिवासी शेतकरी बाळू ठोंबरे यांच्या कडील लहान वासरू त्यांच्या अन्य जनावरांसह जंगलात चरायला गेले होते. नेहमीप्रमाणे ती जनावरे चारून आली मात्र त्यातील एक वासरू घरी परत न आल्याने शेतकरी बाळू ठोंबरे यांनी जंगलाकडे धाव घेतली; मात्र अंधार पडल्याने वाडी मधील शेतकऱ्यांच्या हाती काही लागले नाही.

सकाळी पुन्हा वाडीतील ग्रामस्थ त्या वासराचा शोध घेण्यासाठी गेले असता जंगलात ते वासरू रक्ताच्या थारोळ्यात मृत अवस्थेत आढळून आले. त्या वासराचा जबडा हिंस्त्र प्राण्याने ओढून त्या वासराचे रक्त पिऊन पसार झाला होता. त्यांनतर शेतकऱ्यांनी वन विभागाचे वनपाल विठ्ठल खांडेकर यांना हि माहिती दिली असता, वन विभागाचे कर्मचारी तेथे पोहचले. वन विभागाने त्या मृत वासराचा पंचनामा केला असता, त्या वासराचा मृत्यू हा हिंस्त्र प्राण्याने हल्ला कल्याने झाला असल्याचा अहवाल तयार करून वरिष्ठ कार्यालयाला पाठवला आहे.

logo
marathi.freepressjournal.in