

डोंबिवली : कोकणात तसेच काही ठिकाणी बिबट्यांचा वावर मोठ्या प्रमाणात सुरू असताना आता कल्याण-डोंबिवलीजवळील उंबार्ली गावात गुरुवारी रात्री बिबट्याचे दर्शन झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मानपाडा पेट्रोल पंपाजवळील डाव्या बाजूच्या वळणावर, ‘कावळ्याचे गाव’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उंबार्ली परिसरात रात्री बिबट्या फिरताना दिसल्याचे स्थानिकांनी सांगितले. हिरेश मडवी हे आपल्या चारचाकी वाहनातून गावातून जात असताना अचानक त्यांच्या वाहनाला जोरदार धडक बसली. धडक कशाची आहे हे पाहण्यासाठी त्यांनी तत्काळ वाहनाच्या हेडलाइटचा प्रकाश पुढे टाकला असता, समोरच बिबट्या उभा असल्याचे त्यांना स्पष्ट दिसले. या घटनेनंतर गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, वनविभागाला तत्काळ माहिती देण्यात आली आहे.