मासुंदा तलावावर होऊ दे खर्च

शहरात अस्तित्वात असलेल्या या ३३ तलावांपैकी अनेक तलावांची दुरावस्था होऊ लागली
मासुंदा तलावावर होऊ दे खर्च

ठाणे शहरामध्ये सुमारे ६० हून अधिक तलाव असल्याची इतिहासात नोंद असली, तरी शहरामध्ये सद्य:स्थितीत ३३ तलाव अस्तित्वात असल्याचे महापालिकेकडून सांगण्यात येत आहे. शहरात अस्तित्वात असलेल्या या ३३ तलावांपैकी अनेक तलावांची दुरावस्था होऊ लागली असून, सुशोभीकरण, स्वच्छता आणि संवर्धनासाठी गेल्या दशकात कोटय़वधींचा निधी खर्च होऊनसुद्धा मासुंदा तलावाचा अपवाद वगळता बहुतांशी तलावांच्या स्थितीत कोणताही बदल झालेला दिसत नाही. विशेष म्हणजे मासुंदा या एकमेव तलावावर केंद्र सरकारच्या स्मार्टसिटी योजनेतून गेल्या काही वर्षांत ५० कोटी खर्च करून सुशोभीकरण केलेले असताना सुध्दा, पुन्हा याच तलावावर एमएमआरडीएकडून विद्युत कामांसाठी नव्याने ५० कोटी खर्च करण्यात येत आहे.

काही वर्षापूर्वी झालेल्या सर्व्हेक्षणात ठाणे शहरात १६ तलाव जिवंत असल्याचे आणि ३४ तलाव बुजवले असल्याचे उघड झाले होते. या तलावांकडे ज्या प्रमाणात महापालिकेने लक्ष दिले पाहिजे त्या प्रमाणात ते दिले जात नसल्याचे आरोप वेळोवेळी झाले आहेत. ठिकठिकाणच्या तलावात मोठ्या प्रमाणात निर्माल्य टाकले जाते, बांधकाम साहित्य फेकले जाते, लाकडी वस्तू कपडे टाकले जातात ते सर्व कुजून दुर्गंधी निर्माण होते. त्यातही कधी काळी नैसर्गिक झरे असलेले मोकळे महाकाय तलाव नागरीकरणासाठी कॉंक्रिटच्या भिंतीत बंदिस्त करण्यात आले आहेत. तलावाच्या लगत चिखल असायला हवा त्यामुळे त्या चिखलात किटकांचे उत्पादन होते आणि ते खायला परिसरात पक्षी येत असतात. तलावातील मासे ते किटक खातात आणि तलावाचे नैसर्गिक सौंदर्य टिकून राहते मात्र सध्या ठाण्यातील बहुतांशी तलाव बंदिस्त असल्याने असे नैसर्गिक वातावरण कोणत्याही तलावाशेजारी नाही.

केंद्र सरकारच्या माध्यमातून तलावांच्या सुशोभीकरणासाठी ६५ कोटी रुपयांचा निधी मिळावा यासाठी महापालिकेने गेल्या दशकात प्रयत्न केले होते मात्र तो प्रयत्न यशस्वी होऊ शकला नाही. दरम्यान आठ वर्षांपूर्वी ठाणे शहरातील सहा तलावांच्या सुशोभीकरणाला राज्य शासनाने हिरवा कंदील दाखवला आणि या कामासाठी २३ कोटी ५५ लाखाचा निधी मंजूर केला. त्यातून ठाणे शहरातील मासुंदा तलाव, हरिओम नगर तलाव, जेल तलाव, घोडबंदर रोड येथील तुर्भे पाडा तलाव, नार तलाव, कावेसर तलाव या यांचे सुशोभीकरण करण्यात आले होते मात्र एवढा मोठा खर्च करूनही या तलावांच्या स्थितीत विशेष फरक पडलेला दिसला नाही.

दरम्यान सध्या ठाण्यातील ३३ तलावांपैकी सहा हेक्टरचे पाणथळ क्षेत्र असलेल्या मासुंदा तलावावर आमदार निधी, खासदार निधी, सरोवर संवर्धन निधी, महापालिकेचा निधी, स्मार्ट सिटीचा निधी असा सुमारे ५० कोटींचा खर्च करण्यात आला आहे. विशेष म्हणजे पुन्हा एकदा मासुंदा तलावावर एमएमआरडीएच्या माध्यमातून आणखी सुमारे ५० कोटींपर्यंतचा खर्च करण्यात येत आहे.

मासुंदा तलावाच्या विद्युत सुशोभीकरणासाठी ४९ कोटी ६१ लाख रुपयांच्या खर्चाला मंजुरी देण्यात आली असून यामध्ये सुमारे ३५ कोटी ५७ लाख रुपये खर्च करून तलावामध्ये संगीत व प्रकाश योजनेसह कारंजे आणि लेझर शोची निर्मिती करण्यात येणार आहे. तर तलावामध्ये ७१ लाख १९ हजार रुपये खर्च करून तरंगते व्यासपीठ उभारण्यात येणार आहे.

ठाण्यात होते १०० तलाव

ब्रिटिश गॅझेटमधे ठाणे शहरात जवळपास १००च्यावर लहानमोठे तलाव असल्याचा उल्लेख आहे. मात्र या शहरातील नागरीकरण जसे वाढले तसे या तलावांवरच पहिली अतिक्रमणं करण्यात आली.

त्यामुळे बर्याच नैसर्गिक तलावांवर टाच आली. त्यामूळे आता शहरात अवघे ३३ तलाव शिल्लक आहेत.

logo
marathi.freepressjournal.in