शिवरायांच्या प्रेरणादायी इतिहासाचा वारसा जपूया; कुळगाव-बदलापूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी योगेश गोडसे यांचे आवाहन

मराठा समाज हितवर्धक मंडळाच्या वतीने आयोजित चार दिवसीय मराठा महोत्सवाचे बदलापूर पूर्वेकडील तालुका क्रीडा संकुलात मुख्याधिकारी योगेश गोडसे यांच्या हस्ते उद्घाटन झाले.
शिवरायांच्या प्रेरणादायी इतिहासाचा वारसा जपूया; कुळगाव-बदलापूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी योगेश गोडसे यांचे आवाहन

बदलापूर : छत्रपती शिवाजी महाराज यांचा प्रेरणादायी इतिहास सर्वांनाच प्रेरणा देत आला आहे. आपल्याला महाराजांकडून संघर्षाचा वारसा मिळाला आहे. लोकहिताच्या चांगल्या कामासाठी संघर्ष करून शिवरायांच्या प्रेरणादायी इतिहासाचा हा वारसा जपूया, असे आवाहन कुळगाव -बदलापूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी योगेश गोडसे यांनी केले.

मराठा समाज हितवर्धक मंडळाच्या वतीने आयोजित चार दिवसीय मराठा महोत्सवाचे बदलापूर पूर्वेकडील तालुका क्रीडा संकुलात मुख्याधिकारी योगेश गोडसे यांच्या हस्ते उद्घाटन झाले. याप्रसंगी महोत्सवाचे स्वागताध्यक्ष संजय जाधव, राजू लाड, संभाजी शिंदे, अरुण सुरवळ, अविनाश देशमुख, अरुण चव्हाण, सुहास पोखरकर, प्रियांका दामले, संतोष रायजाधव, दादासाहेब पाटील आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते.

यावेळी उद्घाटक म्हणून बोलताना, योगेश गोडसे यांनी गेल्या अनेक वर्षांपासून शहरात दिमाखदार असा मराठा महोत्सव आयोजित करण्यात येत असल्याबद्दल आयोजकांचे कौतुक केले. पुढे बोलताना त्यांनी, बाराव्या शतकात राजा रामदेवराय यांचा पराभव झाल्यानंतर सुमारे ५०० वर्ष असलेल्या तत्कालीन सामाजिक राजकीय परिस्थितीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून कसा बदल झाला, याबाबत भाष्य करून छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेल्या अनमोल अशा योगदानाविषयी कृतज्ञता व्यक्त केली.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा एक अंश जरी आचरणात आणला तरी खूप मोठे काम होईल, असे सांगून शिवरायांचा प्रेरणादायी इतिहास नव्या पिढीपर्यंत रुजवण्यासाठी प्रयत्न व्हावेत, चांगल्या कामांसाठी समाजाने एकजुटीने पुढे यावे असे आवाहनही मुख्याधिकारी योगेश गोडसे यांनी केले.

मराठा समाजाने एकसंघ राहून समाजाच्या प्रगतीला हातभार लावावा, असे आवाहन स्वागताध्यक्ष संजय जाधव यांनी केले. मराठा महोत्सवाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमांच्या सांस्कृतिक मेजवानीचा आनंद घ्यावा, तसेच सकल मराठा समाजाच्या वतीने उभारण्यात येत असलेल्या सकल मराठा भवनच्या उभारणीत योगदान द्यावे, असेही आवाहन जाधव यांनी मराठा समाज बांधवांना केले. प्रियांका दामले, संभाजी शिंदे व अरुण सुरवळ यांनीही आपले विचार मांडले.

मराठी परंपरेला साजेसा महोत्सव

चार दिवसीय मराठा महोत्सवाच्या उद्घाटनाच्या पहिल्या दिवशी शुक्रवारी (ता.१६) शाहीर रामानंद उगले यांचा शिवदर्शन पोवाडा तसेच मराठी लोकगीते सादर करण्यात आली. शनिवारी (ता.१७) महिलांसाठी खेळ पैठणीचा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. रविवारी (ता.१८) वारकरी परंपरेची भजन स्पर्धा होणार आहे. तर रविवारी (ता.१९) छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त भव्य मिरवणूक व बाईक रॅली तसेच 'महाराष्ट्राची लोकधारा गंध स्वराज्याच्या संस्कृतीचा' हा कार्यक्रम सादर होणार आहे. मराठमोळी संस्कृती परंपरा जपण्याचा उद्देशाने या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आल्याचे संभाजी शिंदे व अविनाश देशमुख यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in