सामान्य नागरिक,शेतकरी बांधवांसाठी प्रभावशाली काम करण्याचा संकल्प करूया - रविंद्र चव्हाण

देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात आपल्या प्राणाची आहुती देणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांना मी अभिवादन करतो.
सामान्य नागरिक,शेतकरी बांधवांसाठी  प्रभावशाली काम करण्याचा संकल्प करूया - रविंद्र चव्हाण

ठाणे जिल्ह्यातील सामान्य नागरिकांना रस्ते, पिण्याचे पाणी, दळणवळणाच्या सुविधा, शेतकरी बांधवांना विविध योजनांतून मदत, आरोग्य सुविधा यासाठी अधिक प्रभावशाली काम करण्याचा संकल्प करूया, असे आवाहन सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रमवगळून), अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री रविंद्र चव्हाण यांनी सोमवारी केले.

ठाणे जिल्ह्याचा लोकप्रतिनीधी म्हणून मला अमृतमहोत्सवी वर्षांत ध्वजवंदनाची संधी मिळाल्याने कृतार्थ झाल्याची भावना व्यक्त करून चव्हाण यांनी जिल्ह्यातील नागरिकांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी बोलताना चव्हाण म्हणाले की, देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात आपल्या प्राणाची आहुती देणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांना मी अभिवादन करतो. स्वातंत्र्य लढ्यातील ज्ञात अज्ञात अनामवीरांचे स्मरण करतानाचा, त्यांच्या कार्याला वंदन करण्यासाठी आणि तरुण पिढीला स्वातंत्र्य लढ्याविषयी माहिती व्हावी यासाठी देशभऱ अमृत महोत्सव आयोजित केला आहे. स्वातंत्र्याच्या या अमृत महोत्सवीवर्षांत अजून एक महत्वपूर्ण आणि लक्षणीय गोष्ट घडली आणि ती म्हणजे आपल्या ठाणे जिल्ह्याला मुख्यमंत्रिपदाचा मान मिळाला. ही आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे. आपल्या जिल्ह्यातून एकनाथ शिंदे यांच्या रुपाने राज्याला विकासाची दिशा दाखविणारे नेतृत्व मिळाले आहे, ही आनंदाची बाब आहे. देशाच्या ७५ व्या स्वातंत्र्यदिनाच्या वर्धापनदिनी चव्हाण यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात ध्वजारोहण झाले. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा पुष्पा पाटील, जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, पोलीस आयुक्त जयजित सिंह, महापालिका आयुक्त विपीन शर्मा, अतिरिक्त जिल्हाधिकारी मनिषा जायभाये, निवासी उपजिल्हाधिकारी सुदाम परदेशी यांच्यासह अधिकारी, कर्मचारी, नागरिक उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in