ठाण्यातील शिवसैनिकांचे नरेंद्र मोदी यांना सह्यांचे पत्र

देशाच्या संविधानाचा आदर करून कोणताही पक्षपातीपणा न करता देशातील सर्व जनतेच्या विकासासाठी कार्य करीन
ठाण्यातील शिवसैनिकांचे नरेंद्र मोदी यांना सह्यांचे पत्र

वेदांता प्रकल्प महाराष्ट्रात परत पाठवा या मागणीसाठी ठाणे रेल्वेस्थानकाबाहेर शिवसेना व युवासेनेच्या वतीने सह्यांची मोहीम राबविण्यात आली. हे पत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देण्यात येणार आहे. या स्वाक्षरी मोहिमेला नागरिकांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळाला.

या पत्रामध्ये दि. ३० मे २०१९ च्या दिवसाची आठवण करून दुसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून शपथ घेताना आम्हा देशवासीयांना ग्वाही दिली होती की, देशाच्या संविधानाचा आदर करून कोणताही पक्षपातीपणा न करता देशातील सर्व जनतेच्या विकासासाठी कार्य करीन, परंतु आज आमच्या महाराष्ट्राच्या वाट्याला एक लाख रोजगार निर्मितीचा वेदांता फॉक्सकॉन सेमीकंडक्टर प्रकल्प अचानक गुजरातला नेल्याने महाराष्ट्रावर एक प्रकारचे अन्याय केल्याचे दिसून आले आहे. आपण पंतप्रधान आहात, सगळ्या देशाचे पालक आहात. तेव्हा एका मुलाला न्याय देतांना दुसऱ्या मुलावर अन्याय आपण कसा करू शकता असे पत्रात म्हटले आहे.

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे, उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी मेहनत करून महाराष्ट्रासाठी मंजूर झालेला हा प्रकल्प गुजरातला पळवल्याने नागरिकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे.

महाराष्ट्रात महाविकास आघाडीने दोन्ही कंपन्यांच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून प्रकल्प राज्यात तळेगाव, पुणे येथे सुरू करण्याचा निर्णय झाला होता. महाराष्ट्र सरकारकडून प्रकल्पासाठी ३९ हजार कोटी सवलत देण्यात आली होती. २० वर्षासाठी प्रतिदिन ८० दशलक्ष लिटर पाणी, स्टॅम्प ड्युटीत पाच टक्के सवलत, वीज दरात दहा वर्षासाठी ७.५ टक्के सवलत, तळेगावला ४०० एकर जागा मोफत आणि ७०० एकर जागा ७५ टक्के सवलतीच्या दराने २० वर्षासाठी या कंपनीला १२०० मेगावॅट वीज पुरवठा ३ रुपये युनिट दराने, पाणीपट्टीत ३३७ कोटी व घनकचरात ८१२ कोटीची सवलत जाहीर केली होती. त्यामुळे या कंपनीने महाराष्ट्रात १.५३ लाख कोटीची गुंतवणुकीची तयारी दर्शवली होती. त्यातून राज्यातील किमान एक लाख रोजगार निर्मिती होणार होती.

२६ जुलै २०२२ रोजी मुख्यमंत्री कार्यालयाकडून देखील हा प्रकल्प महाराष्ट्रातच सुरू होत असल्याचे जाहीर देखील केले होते. राज्याच्या जीडीपीमध्ये देखील या प्रकल्पाने वाढ झाली असती परंतु ते सगळे केलेली मेहनत व प्रयत्न संपविण्यात येत असल्याचे पत्रात नमुद करण्यात आले आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in