ठाण्यात विचारे-शिंदे यांच्यात लेटर वॉर; राजन विचारे यांच्या पत्राला शिंदे गटाचे उत्तर

राजन विचारे यांनी धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावे अनावृत्त पत्र लिहीत एकनाथ शिंदे यांना त्यांनी केलेल्या बंडखोरीवरून डिवचले होते
ठाण्यात विचारे-शिंदे यांच्यात लेटर वॉर; राजन विचारे यांच्या पत्राला शिंदे गटाचे उत्तर

शिवसेनेत उभी फूट पाडून एकनाथ शिंदे राज्याचे मुख्यमंत्री झाले, जिल्ह्यावर शिंदे यांचे गेली कित्येक वर्ष एकहाती नेतृत्व असल्याने बहुतांशी महापालिकेतील, नगरपालिकेतील नगरसेवक आणि महत्वाचे पदाधिकारी शिंदे गटात सहभागी झाल्याचे मत ठाण्याचे खासदार राजन विचारे यांनी व्यक्त केले आहे. मात्र सुरवातीपासून विचारे मातोश्रीच्या संपर्कात होते, त्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी लोकसभेच्या शिवसेना प्रतोदपदी त्यांची नियुक्ती केली आहे.

राजन विचारे यांनी धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावे अनावृत्त पत्र लिहीत एकनाथ शिंदे यांना त्यांनी केलेल्या बंडखोरीवरून डिवचले होते मात्र त्यानंतर २४ तासात शिंदे समर्थक उद्धवराव जगताप यांनी दिघे साहेबांनाच पत्र, लिहले असून ज्या आमदार, खासदारांना हे गद्दार म्हणत आहेत, त्यांच्यामागे आज लाखो शिवसैनिक आहेत. आमच्या बिचाऱ्या खासदारामागे पत्नी सोडली तर एकही लोकप्रतिनिधी दिसत नाही मी, माझी बायको, माझा पुतण्या, माझ्या मुली, माझा धंदा आणि सत्तेतून लाटता येणारा मलिदा याच्या पलिकडे त्यांना कधी काय दिसलंय का ? असा सवाल विचारत राज विचारे यांच्यावर पलटवार केला आहे.

रविवारी मातोश्रीवर जाऊन शक्तिप्रदर्शन केल्यानंतर खासदार राजन विचारे यांनी आनंद दिघे यांना भावनिक पत्र लिहिले होते. आज तुमची आठवण येतेय साहेब ... शिवसेनेच्या ५६ वर्षांच्या इतिहासात विजयाची नांदी आपल्या ठाण्यात झाली होती ना साहेब ... तेव्हा तुमची ५६ इंचाची छाती अभिमानाने भरलेली पाहिली होती आम्ही, साहेब ज्या ठाण्यावर तुम्हाला अभिमान होता, महाराष्ट्रात ज्या ठाण्याने आपल्याला पहिल्यांदा सत्ता दिली, आज त्याच ठाण्यावर गद्दारीचा शिक्का बसलाय...छातीवर नाही तर पाठीवर वार झालाय साहेब... ह्या आधी जेव्हा असे झाले होते तेव्हा गद्दारांना क्षमा नाही... हे तुम्हीच बोलला होता ना साहेब ..

आज हे दुसऱ्यांदा झालंय... पण तुम्ही नाही आहात... मग ह्यांना कसे माफ करायचे आम्ही ... साहेब आज आनंदाश्रमाकडे पाहिले आणि टचकन डोळ्यात पाणी आले .... ह्याच मंदिरात आम्हा सगळ्यांना शिवबंधन बांधले होते तुम्ही... आज तेच बंधन माझ्या डोळ्यासमोर तुटताना बघतोय म्हणून गहिवरून येतंय साहेब.. तुम्हाला होणाऱ्या वेदना आम्हालाही होतायेत... पण रडायचं नाही... लढायचं... हा विचार घेऊन पुढे जाणारी संघटना आहे आपली... साहेब शेवटच्या श्वासापर्यंत संघटनेसाठी काम करताना पाहिलंय तुम्हाला... म्हणून आज तुमची आठवण येतेय साहेब... असा मजूकर असलेल्या पत्रातून थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरच आसूड ओढण्यात आले होते.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in