रस्ते विकास महामंडळाविरोधात स्थानिक भूमिपुत्र आक्रमक; बिल्डरधार्जिणे विकासकामांवर पिंपळास ग्रामस्थांची नाराजी

भिवंडी तालुक्यातील मुंबई-नाशिक महामार्ग पिंपळास फाटा येथे भुयारी मार्ग होण्यासाठी ग्रामस्थांनी यापूर्वी केलेल्या आंदोलनानंतर रस्ते विकास महामंडळ ग्रामस्थांना समाधानकारक उत्तरे देत नसल्याने स्थानिकांमध्ये नाराजी
रस्ते विकास महामंडळाविरोधात स्थानिक भूमिपुत्र आक्रमक; बिल्डरधार्जिणे विकासकामांवर पिंपळास ग्रामस्थांची नाराजी

भिवंडी : तालुक्यातील मुंबई-नाशिक महामार्ग पिंपळास फाटा येथे भुयारी मार्ग होण्यासाठी ग्रामस्थांनी यापूर्वी केलेल्या आंदोलनानंतर रस्ते विकास महामंडळ ग्रामस्थांना समाधानकारक उत्तरे देत नसल्याने स्थानिकांमध्ये नाराजी पसरली आहे. त्याचबरोबर रेल्वेचे कारण देत रस्त्याची उंची वाढवत असल्याचे सांगत असले तरी गोदाम विकासकधार्जिणे धोरण राबवत असल्याने ग्रामस्थ संतप्त झाले असून पुन्हा आंदोलन करण्याच्या पवित्र्यात असल्याचे भूमिपुत्र शेतकरी संघटना पिंपळासच्या वतीने सांगण्यात आले आहे.

याबाबत त्यांनी रस्ते विकास महामंडळास पुन्हा पत्र दिले असून पत्रात म्हटले आहे की, भूमिपुत्र संघटनेने २४ जानेवारी २०२४ व १५ फेब्रुवारी २०२४ रोजी पत्र दिले होते व पिंपळास फाटा (क्रॉसिंग) येथे भुयारी मार्ग होण्याबाबत १८ डिसेंबर २०२३ रोजी एक दिवसीय चक्काजाम आंदोलन देखील करण्यात आले होते. त्याची दखल घेऊन रस्ते विकास महामंडळाने पत्रव्यवहार केला आहे. मात्र सदर पत्रात समाधानकारक व कायमस्वरूपी मार्ग निघण्याचे आश्वासन दिसत नसल्याचे भूमिपुत्र संघटनेने सांगून हा अंडरपास (भुयारी मार्ग) पिंपळास क्रॉसिंगवर होईल का किंवा इतर कोणत्या ठिकाणी होऊन त्याची रुंदी व उंचीचा देखील उल्लेख करून भुयारी मार्गाची प्लॅन कॉपी देखील जोडली आहे.

परंतु यासंदर्भात रेल्वे विकास महामंडळाने रेल्वे प्रशासनाने काही पत्रव्यवहार केला असल्यास त्याची एक प्रत भूमिपुत्र संघटनेला देणे आवश्यक होते. मात्र तसे न करता रस्त्याची उंची काही ठिकाणी जास्त तर काही ठीकाणी एकदम कमी घेण्याचा कारण म्हणजेच बाहेरील विकासक व उद्योजकांच्या प्रकल्पांसाठी हा सर्व खटाटोप असल्याचा आरोप पिंपळास ग्रामस्थांनी केला आहे. त्यामुळे या रस्त्याची योग्य ती उपाय योजना करून पिंपळास ग्रामस्थांना दिलासा द्यावा, अन्यथा रस्ते विकास महामंडळाच्या विरोधात तीव्र आंदोलनाचा इशारा भूमिपुत्र संघटनेच्या वतीने लेखी निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.

ठाणे-वडपे रस्त्यावर रेल्वे पूल ते पिंपळास जंक्शनदरम्यान तीव्र उतार आहे. अस्तित्वातील उतार हा सध्याच्या रेल्वे पुलाच्या उंचीनुसार ४ टक्के आहे. त्यामुळे भविष्यात रेल्वे पूल होणार असेल तर रेल्वे प्रशासनाला अडचणी येतील म्हणून एवढी उंची वाढवण्यात आली आहे.

- सुभाष बोरसे, कार्यकारी अभियंता महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ मुंबई

अंजूर दिवे ते वडपे नाशिक महामार्ग (हायवे) लगत अनेक विकासकांचे व उद्योजकांचे गोदाम, उद्योग व व्यवसाय आहेत. त्यांच्या प्रत्येकाच्या प्रवेशद्वारा जवळून चढउतार घेऊन त्यांना उंचीचा त्रास होऊ नये, म्हणून विकासक व उद्योजकांच्या सोयीनुसारच उंची कमी जास्त करण्यात आली असून यात मोठ्या प्रमाणात अर्थपूर्ण गैरव्यवहार झाल्याची शक्यता नाकारता येत नाही.

- जगदीश पताळे, अध्यक्ष भूमिपुत्र शेतकरी संघटना पिंपळास

logo
marathi.freepressjournal.in