सेंट्रल पार्कमधील गर्दीमुळे स्थानिक हैराण, वाहतूककोंडीमुळे सुट्टीच्या दिवशीही घराबाहेर पडणे मुश्कील

तब्बल २० एकरमध्ये बांधण्यात आलेले सेंट्रल पार्क हे ठाणेकर आणि ठाण्याच्या बाहेरील नागरिकांसाठी पर्वणी ठरत असले तरी, आता सेंट्रल पार्कमध्ये होणाऱ्या गर्दीमुळे स्थानिक नागरिक मात्र हैराण झाले आहेत.
सेंट्रल पार्कमधील गर्दीमुळे स्थानिक हैराण, वाहतूककोंडीमुळे सुट्टीच्या दिवशीही घराबाहेर पडणे मुश्कील
Published on

ठाणे : तब्बल २० एकरमध्ये बांधण्यात आलेले सेंट्रल पार्क हे ठाणेकर आणि ठाण्याच्या बाहेरील नागरिकांसाठी पर्वणी ठरत असले तरी, आता सेंट्रल पार्कमध्ये होणाऱ्या गर्दीमुळे स्थानिक नागरिक मात्र हैराण झाले आहेत. पार्क बघण्यासाठी आणि पार्कचा आनंद लुटण्यासाठी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे, विशेष करून शनिवारी आणि रविवारी सुट्टीच्या दिवशी, तर मोठ्या प्रमाणात नागरिक आपल्या वाहनाने हे पार्क बघण्यासाठी येत असल्याने या भागात मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी होत असून पर्यायाने स्थानिक नागरिकांना घराच्या बाहेर पडणे देखील मुश्कील झाले आहे.त्यामुळे पार्कला जाण्यासाठी काही तरी पर्यायी मार्ग काढावा, अशी मागणी आता स्थानिक रहिवाशांकडून जोर धरू लागली आहे.

या सेंट्रल पार्कचे उद‌्घाटन करण्यात आले त्याच्या दुसऱ्याच दिवशी १७ हजार नागरिकांनी या सेंट्रल पार्कला भेट दिली होती. त्यानंतर हे पार्क बघण्यासाठी नागरिकांची गर्दी सुरूच आहे. शहरातील घोडबंदर प्रमाणे कोलशेत भागात मोठे गृहप्रकल्प उभे राहिले आहेत. त्यामुळे येथील कोलशेत गाव, हायलँड, ढोकाळी भागात मोठ्या प्रमाणात नागरिकीकरण वाढली आहे. येथील सदनिकांच्या किमती देखील कोटीच्या घरात गेल्या आहेत. असे असले, तरी येथील ढोकाळी-कोलशेत रस्ता वाहतुकीच्या तुलनेत अरुंद आहे. त्यामुळे अनेकदा या मार्गावर चालकांना कोंडीचा सामना करावा लागत असतो.

काही महिन्यांपूर्वी ठाणे महापालिका आणि वाहतूक विभागाने कापूरबावडी येथून ढोकाळीच्या दिशेने वाहतूक करणारी मार्गिका बंद केली. त्यामुळे वाहनचालकांना हायलँड मार्गे प्रवास करावा लागतो. त्यामुळे सेंट्रल पार्कमुळे होणाऱ्या कोंडीचा परिणाम हायलँड आणि ढोकाळी मार्गावरही दिसू लागला आहे. कल्पतरू पार्कसिटीच्या रस्त्यावर देखील कोंडी असते. कोलशेत भागातील नागरिक कोंडीमुळे सायंकाळी बाहेर पडणे टाळू लागले आहेत. सेंट्रल पार्कमुळे कोलशेत रोड परिसरात कोंडी होते. त्यामुळे येथे वाहतूक सहाय्यक उपलब्ध करण्यासंदर्भात पत्रव्यवहार करण्यात आला असल्याची माहिती वाहतूक विभागाच्या वतीने देण्यात आली आहे.

२० एकरमध्ये सेंट्रल पार्क

कोलशेत या ठिकाणी टीडीआर कन्स्ट्रक्शनच्या माध्यमातून २० एकर मध्ये हे ग्रँड सेंट्रल पार्क बांधण्यात आले आहे. या पार्कचे उद‌्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले. चार विभागात हे पार्क विकसित करण्यात आले असून, पहिल्या विभागात लहान मुलांसाठी खेळणी, विविध गेम, फाऊंटन असे आहे, ज्या ठिकाणी मुलांना नाचत- बागडत भिजण्याचा आनंद घेता येणार आहे. लॉन टेनीस, मल्टीपल कोर्ट, बास्केट बॉल, व्हॉलीबालसह इतर विविध खेळ खेळात येणार आहेत. या ठिकाणी स्केट पार्क- या ठिकाणी स्केटींगसह विविध ॲडव्हेंचर गेम खेळता येणार आहेत.

logo
marathi.freepressjournal.in