सुमित घरत/भिवंडी
लोकसभा निवडणूक २०२४ चे वारे वाहू लागले असून निवडणुकीच्या तारखा निश्चित झाल्या आहेत. त्यामुळे यावेळच्या लोकसभा निवडणुकीत भिवंडीतील राष्ट्रवादीतून पक्षांतर केलेले भाजपचे दोन वेळचे मातब्बर उमेदवार तथा खासदार कपिल पाटील यांना २०२४ निवडणुकीत कोणता विरोधी पक्ष अथवा त्यापेक्षा महत्त्वाचे म्हणजे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आव्हान देणार, अशी चर्चा संपूर्ण भिवंडी लोकसभा मतदारसंघातून रंगली आहे.
भाजपने पक्षबांधणी व प्रचार यापूर्वीपासूनच जोमाने सुरू केला आहे. परंतु अन्य पक्षांचा विचार करता केंद्रीय मंत्र्यांना शिकस्त देणे तितके सोपे नसल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. दरम्यान, यापूर्वीच्या भिवंडी लोकसभेच्या निवडणुकांच्या आकडेवारीची चाचपणी केली असता त्यामध्ये सुरेश (बाळ्या मामा) म्हात्रे यांनी दोनदा मंत्री पाटील यांना आव्हान देण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र त्यामध्ये म्हात्रेंना अपयशच सहन करावे लागले आहे. तर नुकतेच राष्ट्रवादीचे संस्थापक अध्यक्ष शरदचंद्र पवार यांनी पुन्हा बाळ्या मामा यांना पक्षात सामील करून भिवंडी लोकसभेवर दावा ठोकण्यासाठी जोर लावला. परंतु त्यानंतर बाळ्या मामांवरही काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये रस्सीखेच झाल्याचे वृत्त झळकले.
पाणीटंचाईचा प्रश्न कायम
कपिल पाटलांना हॅट्ट्रिकपासून रोखण्यासाठी तगडे आव्हान देणारा उमेदवार कोण? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार असून मतदारांमध्ये कपिल पाटीलविरोधी उमेदवाराबाबत संभ्रम कायम आहे. त्यामुळे भाजपविरोधी पक्षश्रेष्ठींचा कौल कोणत्या उमेदवाराला मिळणार हे सद्यस्थितीत गुलदस्त्यातच घोंघावत आहे. दरम्यान कपिल पाटील यांनी ३५ हजार कोटींची नागरी सुविधेची कामे मतदारसंघात केल्याचा दावा केला जात आहे. मात्र आजही त्यांच्या मतदारसंघातील शहरीसह ग्रामीण भागात पाणीटंचाईचा प्रश्न कायम आहे, तसेच भिवंडीकरांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असलेल्या गुजरातच्या टोरंट कंपनीविरोधात आक्रोश असतानाही भाजपने त्या कंपनीला झुकते माप दिले. तसेच त्यांचे २८५ कोटी रुपये कर आकारणीची थकबाकी माफ केल्याने त्याचा भुर्दंड भिवंडीकरांना सोसावा लागला आहे. त्यामुळे या दोन्हीचा फटका मंत्री पाटील यांना बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
निलेश सांबरे नावाची चर्चा
जुन्या आठवणी वगळता जिजाऊ संस्थेचे अध्यक्ष निलेश सांबरे यांच्या नावाची चर्चा तग धरत आहे. विशेष म्हणजे सांबरे यांनी संस्थेमार्फत ठाणे जिल्ह्यासह पालघरमध्ये शहर व ग्रामीणच्या तळागाळातील राबवलेल्या उपक्रमांमुळे भाजपविरोधी पक्षांमध्ये सांबरे यांना उमेदवारी देण्याबाबत विचार केला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यासह काँग्रेसमधून तिकीट मिळवण्यासाठी दयानंद चोरघे यांचीही धडपड सुरू असल्याचेही दिसत आहे. तसेच शिवसेना ठाकरे गटाचे माजी आमदार रूपेश म्हात्रेही खासदारकीच्या रिंगणात उतरण्यासाठी उत्सुक असल्याचेही स्पष्ट होत आहे.