महाविकास आघाडी ठाण्यात एकत्रपणे निवडणूक लढण्याची शक्यता;शिंदे गट भाजपसोबत जाण्याची चिन्हे

गेल्याकाही वर्षात जिल्ह्यात बहुतांशी नगरपरिषदा आणि महापालिकामध्ये भाजप आणि शिवसेनेने यश मिळवले होते
महाविकास आघाडी ठाण्यात एकत्रपणे निवडणूक लढण्याची शक्यता;शिंदे गट भाजपसोबत जाण्याची चिन्हे

सर्वोच्च न्यायालयाने दोन आठवड्यात निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करायला सांगितले असल्याने जिल्ह्यातील महापालिका निवडणुकांची चर्चा सुरु झाली आहे. मुसळधार पाऊस कोसळत असतानाही राजकीय वातावरण चांगलेच तापायला सुरुवात झाली आहे. नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपला गट वेगळा करत भाजपसोबत घरोबा केला असल्याने येणाऱ्या पालिका निवडणुकीत ते भाजपसोबत युती करून निवडणूक लढणार हे उघड असल्याने दुभंगलेली महाविकास आघाडी ठाण्यात एकत्रपणे निवडणूक लढण्याची शक्यता वर्तविली जात आहे. मूळ शिवसेना आणि एकाकी पडलेली काँग्रेस यांना यामुळे नवी उभारी मिळण्याची शक्यता आहे. दुसरीकडे एकनाथ शिंदे गट भाजपसोबत जाण्याच्या शक्यतेने भाजपमध्ये उत्सुकतांची घालमेल चांगलीच वाढली आहे.

गेल्याकाही वर्षात जिल्ह्यात बहुतांशी नगरपरिषदा आणि महापालिकामध्ये भाजप आणि शिवसेनेने यश मिळवले होते. त्यातही भाजपचा आलेख वाढत चालला होता. कल्याण डोंबिवलीत ९ चे ४० नगरसेवक झाले, ठाण्यात शिवसेनेची सत्ता आली मात्र भाजपचे ठाण्यातील नगरसेवकांचे बळ चांगलेच वाढले. मात्र त्याचवेळी कधीकाळी जिल्ह्यावर एकहाती सत्ता असलेल्या काँग्रेसची मोठी पीछेहाट झाली आहे. विशेष म्हणजे अडीज वर्षांपूर्वी राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आल्यापासून जिल्ह्याच्या राजकारणात बदल होऊ लागला होता आणि शिवसेना आणि राष्ट्रवादीचे बळ वाढले होते. राज्याच्या मंत्रिमंडळातील दोन महत्वाचे मंत्री एकनाथ शिंदे आणि जितेंद्र आव्हाड हे ठाणे जिल्ह्यातील आहे. त्यामुळे एकही सत्तेचे पद नसलेली काँग्रेस जिल्ह्याच्या राजकारणातही एकाकी पडल्याचे चित्र होते. मात्र गेल्या महिन्यात शिंदे गटाने बंड करून भाजपशी हातमिळवणी केली असल्याने राज्यातील सत्तेत बदल झाला असून एकनाथ शिंदे हे राज्याचे मुख्यमंत्री झाले आहेत.

ठाणे जिल्ह्यात काँग्रेस पक्षाची अवस्था अत्यंत बिकट आहे. जिल्ह्यात एकही खासदार अथवा आमदार निवडून आलेला नाही. भिवंडी महानगरपालिका वगळता एकाही महापालिका, नगरपालिकेवर काँग्रेसची सत्ता नाही, ठाणे महापालिकेत अवघे तीन नगरसेवक निवडून आलेले आहेत. मात्र आता शिंदे गट बाहेर पडला असल्याने मूळ शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांची महाविकास आघाडी ठाण्यात तरी एकत्रितपणे निवडणूक लढवण्याची शक्यता असल्याने याचा मोठा फायदा काँग्रेसला होण्याची शक्यता आहे. ठाण्यातील आहेत ते नगरसेवक आणि कळवा मुंब्रा पट्ट्यातील राष्ट्रवादीचे नगरसेवक पुन्हा निवडून येणार हे उघड असल्याने ठाण्यात महाविकास आघाडी झाल्यास बहुतांशी प्रभागात तुल्यबळ लढती होण्याची शक्यता आहे.

एकनाथ शिंदे यांचे

जिल्ह्यावर एकहाती वर्चस्व

गेल्या सहा वर्षात जिल्ह्यातील बहुतांशी महापालिका, नगरपालिका निवडणुकीत शिवसेनेने यश मिळवले आहे. कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेना भाजप स्वतंत्रपणे लढले. विशेष म्हणजे या निवडणुकीत तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः या निवडणुकीत लक्ष घातले होते. मात्र तरी शिवसेनेला चांगले यश मिळाले, तसेच अंबरनाथ, बदलापूर, मुरबाड, शहापूर नगरपालिकेची निवडणूक, ठाणे महापालिकेच्या निवडणुकीतही शिवसेना आणि भाजप एकमेकांच्या समोर उभे ठाकले असताना शिवसेनेने एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली चांगले यश मिळवले.

ठाण्याच्या जिल्हा परिषदेत शिंदे यांच्या नेतृत्वाखालीच शिवसेनेने इतिहासात पहिल्यांदा बहुमत मिळवले आहे. आता हेच शिंदे भाजपासोबत गेले असल्याने भाजपचे बळ वाढणार आहे.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in