राज्यभरातील IVF, सोनोग्राफी केंद्रांची तपासणी होणार; बदलापूर येथे रूपाली चाकणकर यांची माहिती

स्त्री बीज विक्रीचा विषय केवळ बदलापुरपुरता मर्यादित नसून त्याची पाळेमुळे संपूर्ण महाराष्ट्रात पसरलेली आहेत. ही पाळेमुळे खोदून काढण्यासाठी राज्यभरातील बेकायदेशीर आयव्हीएफ व सोनोग्राफी केंद्रांवर धाडसत्र सुरू करणार असल्याची माहिती राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी दिली.
राज्यभरातील IVF, सोनोग्राफी केंद्रांची तपासणी होणार; बदलापूर येथे रूपाली चाकणकर यांची माहिती
(Photo-X/@ChakankarSpeaks)
Published on

बदलापूर : स्त्री बीज विक्रीचा विषय केवळ बदलापुरपुरता मर्यादित नसून त्याची पाळेमुळे संपूर्ण महाराष्ट्रात पसरलेली आहेत. ही पाळेमुळे खोदून काढण्यासाठी राज्यभरातील बेकायदेशीर आयव्हीएफ व सोनोग्राफी केंद्रांवर धाडसत्र सुरू करणार असल्याची माहिती राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी दिली.

अवैधरित्या स्त्री बीज विक्रीचे प्रकरण बदलापुरात उघडकीस आल्यानंतर राज्यात खळबळ उडाली. गरजू महिलांना पैशांचे आमीष दाखवून त्यांच्या शरीरात स्त्रीबीज विकसित करून ते काढून विक्री करण्याचा बेकायदेशीर प्रकार स्थानिक पोलीस आणि शासकीय आरोग्य यंत्रणेने उघडकीस आणला. त्यानंतर या प्रकरणामागील मोठे रॅकेट समोर येत आहे. सुरुवातीला तीन महिलांना अटक करण्यात आली होती, त्यानंतर आणखी दोघांना अटक करण्यात आली.

या पार्श्वभूमीवर, या प्रकरणाचा आढावा घेण्यासाठी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी गुरुवारी कुळगाव-बदलापूर नगरपरिषदेला भेट दिली. यावेळी त्यांनी बेकायदेशीर आयव्हीएफ आणि सोनोग्राफी केंद्रांच्या तपासणीचे आदेश दिले. यावेळी पोलीस उपायुक्त सचिन गोरे, जिल्हा शल्यचिकित्सक कैलास पवार, नगराध्यक्षा रुचिता घोरपडे, उपनगराध्यक्षा प्रियांका दामले यांनी प्रकरणाची माहिती रूपाली चाकणकर यांना दिली.

या प्रकरणातील आरोपी काही दिवसांपूर्वी बदलापुरात आले होते. नाशिकमध्ये नोंदणी असलेले मात्र ठाण्यात सुरू असलेले एक आयव्हीएफ केंद्र या विक्री प्रकरणात सक्रीय असून त्यावर कारवाई करण्यात आली आहे. एका महिलेने आधारकार्ड बदलून ओळख लपवत प्रवास केल्याचेही तपासात समोर आले आहे तसेच कोणतीही वैद्यकीय पार्श्वभूमी नसलेल्या महिलांकडून इंजेक्शन देणे, औषधे देणे अशा वैद्यकीय प्रक्रिया केल्या जात होत्या. दलाल महिलाच सर्व वैद्यकीय काम करत असल्याने हा प्रकार महिलांच्या जीवाशी खेळ करणारा आहे.

रूपाली चाकणकर, अध्यक्षा, राज्य महिला आयोग

logo
marathi.freepressjournal.in