
ठाणे, कल्याण, उरण आणि बदलापूरसह तालुक्यांमध्ये दिवाळीच्या ऐन सणात मंगळवारी सायंकाळी मुसळधार पावसाने विजेच्या कडकडाटासह चांगलीच आतषबाजी केल्याने नागरिकांचा उत्साह हिरमोड झाला, तर शेतकरी आणि व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाल्याने नाराजी पसरली आहे. अचानक विजांच्या कडकडाटासह आलेल्या पावसामुळे रांगोळ्या, कंदील, किल्ले आणि सजावटीच्या वस्तू भिजून नष्ट झाल्या. बाजारपेठेत खरेदीसाठी आलेल्या नागरिकांची एकच तारांबळ उडाली, तर भात कापणी आणि झोडणीच्या हंगामात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. नागरिकांचा उत्साह हिरमोड झाला आणि दिवाळीच्या तयारीवर पावसाचा मोठा फटका बसला.
उरण : नागरिकांमध्ये दिवाळीचा उत्साह बहरत असतानाच उरण तालुक्यात मंगळवारी सायंकाळी मुसळधार पाऊस सुरू झाला. विजेच्या गडगडाटासह आलेल्या या पावसाने नागरिकांचा दिवाळी उत्साह थोडासा विरळ केला तर शेतकऱ्यांनाही मोठा फटका बसला. उरण परिसरात सध्या भात कापणी आणि झोडणीचा हंगाम जोरात सुरू आहे. अचानक आलेल्या पावसामुळे कापलेले तसेच झोडलेले भात भिजल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
दिवाळीनिमित्त बाजारपेठा सजल्या असून कंदील, पणत्या, रांगोळी, कपडे, घर सजावटीची वस्तू आणि किल्ल्यांसाठी लागणारे मावळे विक्रीसाठी उपलब्ध होते. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी व्यापाऱ्यांकडून खरेदीवर मोठ्या सवलती देण्यात आल्या होत्या. अवघे दोन ते तीन दिवस दिवाळीला राहिल्यामुळे नागरिकांची दिवाळी साहित्य आणि कपडे खरेदी करण्याची लगबग सुरू होती.
तसेच विविध भागातून अनेक फेरीवाले गावागावातील बाजारात दाखल झाले होते आणि आपली दुकाने मांडली होती. ग्राहक आनंदाने खरेदी करत होते. मात्र, अचानक मंगळवारी सायंकाळी विजेच्या गडगडाटासह सोसाट्याचा वारा सुटला आणि मुसळधार पावसाच्या धारे कोसळू लागल्या. या पावसामुळे ग्राहक आणि विक्रेत्यांची सर्वांचीच तारांबळ उडाली.
नागरिकांचा हिरमोड
रांगोळी, पणत्या, मावळे विक्री करणारे फेरीवाले यांचे मोठे नुकसान झाले. पावसामुळे रांगोळी व पणत्या भिजून खराब झाल्या, तर मावळ्यांचा रंग उडला. तसेच घरांवर केलेली रोषणाई, अंगणातील रांगोळ्या आणि आकाशकंदील देखील जोरदार पावसामुळे खराब झाले. त्यामुळे दिवाळीच्या तयारीत व्यापाऱ्यांचे तसेच शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून नागरिकांचाही हिरमोड झाला.
ठाणे, कल्याण, अंबरनाथ, बदलापुरात अवकाळी पावसाचे धुमशान
बदलापूर /अंबरनाथ : सर्वत्र दिवाळीचा सण उत्साहात साजरा होत असताना ऐन लक्ष्मीपूजनाच्या दिवशीच अंबरनाथ आणि बदलापूरकरांना अवकाळी पावसाने झोडपून टाकले. विजांच्या कडकडाटासह अचानक सुरू झालेल्या या पावसाने नागरिकांची आणि व्यापाऱ्यांची एकच तारांबळ उडवून दिली.
मंगळवारी संध्याकाळी सुमारे ५.१५ वाजण्याच्या सुमारास अंबरनाथ व बदलापुरात जोरदार पावसाला सुरुवात झाली. पणत्या, हार, फुले, तोरणे आणि इतर पूजा साहित्य भिजण्यापासून वाचवण्यासाठी धावाधाव करावी लागली. फटाके भिजल्याने फटाके विक्रेत्यांचेही मोठे नुकसान झाले. त्यामुळे त्यांचा दिवाळीचा उत्साह अर्धवट राहिला. सुमारे दीड तासानंतर म्हणजे पावणेसातच्या सुमारास पावसाने विश्रांती घेतली.
बदलापुरात सुमारे तासाभरात १०१.८ मिमी पावसाची नोंद बदलापुरातील खासगी हवामान अभ्यासक अभिजीत मोडक यांनी घेतली असून हा ढगफुटीसदृश पाऊस असल्याचे त्यांनी त्यांच्या सोशल मीडियावर पोस्टमध्ये म्हटले आहे.
फटाके फुटण्याआधीच विझले
दरम्यान, या अवकाळी पावसामुळे वीजपुरवठा खंडित झाला, त्यामुळे घरांमध्ये अधिक पणत्या लावाव्या लागल्या. दिवाळीच्या सणावर आभाळाची ही नाराजी पाहून नागरिकांनी नाराजी व्यक्त केली. रांगोळ्या पुसल्या, फटाके ओले झाले आणि सणाचा आनंदच हरवला, अशी खंत अनेकांनी व्यक्त केली.
ठाणे, कल्याणमध्ये पावसाची हजेरी
ठाणे जिल्ह्यात मंगळवारी दिवाळीच्या उत्साहावर पावसाने पाणी फेरले. जिल्ह्यात सायंकाळी अचानक विजांच्या कडकडाटासह वाऱ्याचा जोर वाढला आणि त्यानंतर मुसळधार पावसाला सुरुवात झाली. अचानक सुरू झालेल्या पावसामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागला.