

ठाणे : सफाई कर्मचाऱ्यांच्या कल्याणासाठी राबवण्यात येणाऱ्या विविध योजनांचा सविस्तर अहवाल १५ दिवसांत सादर करा, असे निर्देश महाराष्ट्र राज्य सफाई कमर्चारी आयोगाचे उपाध्यक्ष मुकेश सारवान यांनी बुधवारी ठाणे महानगरपालिकेला दिले. महापालिकेला भेट देत त्यांनी निर्देश दिले. सफाई कर्मचाऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शासनस्तरावर कोणत्या योजना प्रभावीपणे राबवल्या जात आहेत, त्यांची सद्यस्थिती काय आहे आणि लाभार्थ्यांपर्यंत त्या कितपत पोहोचल्या आहेत, याची माहिती आयोगाने मागवली आहे.
ठाणे महापालिका मुख्यालयात झालेल्या बैठकीत विविध कर्मचारी संघटनांशी संवाद साधताना सारवान यांनी ठाणे पालिकेच्या कामकाजाचे कौतुक केले. सफाई कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांबाबत ठाणे महापालिकेने स्वीकारलेली कार्यपद्धती राज्यातील इतर महापालिकांसाठी आदर्श ठरू शकते, असे मत त्यांनी व्यक्त केले. याच धर्तीवर इतर महापालिकांनीही काम केल्यास सफाई कर्मचाऱ्यांचे अनेक प्रश्न मार्गी लागू शकतात, असे ते म्हणाले. बैठकीत सफाई कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांबाबत निवेदने सादर करण्यात आली. त्यावर तातडीने योग्य ती कारवाई करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्याची माहिती सारवान यांनी पत्रकार परिषदेत दिली तसेच आस्थापना विभागासोबत झालेल्या चर्चेत सफाई कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांचा आढावा घेण्यात आला. यावेळी महापालिकेचे उपायुक्त जी. जी गोदेपुरे, वैद्यकीय अधिकारी डॉ. राणी शिंदे तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
घरांचे वाटप, नुकसानभरपाई, रिक्त पदाचा तपशील द्या!
डॉ. बाबासाहेब आंबडेकर श्रम साफल्य योजने अंतर्गत २५ वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक सेवा बजावलेल्या सफाई कर्मचाऱ्यांना मोफत मालकी हक्काच्या घरांचे वाटप, दूषित गटारांमध्ये काम करताना मृत्यू किंवा कायम अपंगत्व आलेल्या कर्मचाऱ्यांना देण्यात येणारी नुकसान भरपाई, वारसा हक्काच्या प्रलंबित प्रकरणांचा तपशील तसेच मंजूर, भरलेली आणि रिक्त पदांची माहिती आयोगाने मागवल्याचे त्यांनी सांगितले.