महाराष्ट्र टीईटी पेपरफुटी प्रकरण : आग्रामधील प्रिंटिंग प्रेसच्या तीन कर्मचाऱ्यांना अटक; आतापर्यंत १० जण ताब्यात

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) पेपर फुटीप्रकरणी महाराष्ट्र पोलिसांनी उत्तर प्रदेशमधील आग्रा प्रिंटिंग प्रेसमधील तीन कर्मचाऱ्यांना अटक केली आहे.
महाराष्ट्र टीईटी पेपरफुटी प्रकरण : आग्रामधील प्रिंटिंग प्रेसच्या तीन कर्मचाऱ्यांना अटक; आतापर्यंत १० जण ताब्यात
महाराष्ट्र टीईटी पेपरफुटी प्रकरण : आग्रामधील प्रिंटिंग प्रेसच्या तीन कर्मचाऱ्यांना अटक; आतापर्यंत १० जण ताब्यात प्रातिनिधिक प्रतिमा
Published on

भिवंडी : महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) पेपर फुटीप्रकरणी महाराष्ट्र पोलिसांनी उत्तर प्रदेशमधील आग्रा प्रिंटिंग प्रेसमधील तीन कर्मचाऱ्यांना अटक केली आहे. भिवंडी न्यायदंडाधिकाऱ्यांनी त्यांना ९ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. तिघांच्या अटकेमुळे या प्रकरणातील आरोपींची संख्या आता दहावर पोहोचली आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी रविवारी दिली.

राज्य सरकारने नेमलेल्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) शुक्रवारी आग्रा येथील एका खासगी छपाई कारखान्यातील (प्रिंटिंग प्रेस) कर्मचारी असलेल्या नरेशकुमार माहोरे (३५), संजयकुमार शर्मा (४४) आणि बाबूलाल कुशवाह (४५) यांना अटक केली, अशी माहिती एका पोलीस अधिकाऱ्याने दिली. या तिघांनी छपाई प्रक्रियेदरम्यान एका सुरक्षित ठिकाणाहून प्रश्नपत्रिका चोरून बाहेर काढल्याचा संशय आहे. पोलिसांनी आरोपी संजयकुमार शर्माकडून तीन जिवंत काडतुसेही जप्त केली आहेत.

ठाणे ते हरयाणा कनेक्शन ठाणे जिल्ह्यातील पोलिसांनी प्रश्नपत्रिकेचा काही भाग फुटल्याचे उघडकीला आणत तिघांना अटक केल्यानंतर २८ जूनला होणारी टीईटी २०२६ परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती. या रॅकेटचे जाळे दिल्ली, आग्रा, विहार आणि हरयाणापर्यंत पसरल्याचे एसआयटीच्या तपासात समोर आले आहे.

या आधी कॉल रेकॉर्ड आणि आर्थिक व्यवहारांच्या आधारे मुख्य सूत्रधार बिजेंद्र गुप्ता याच्याशी संबंध असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर त्याची पत्नी सुमन कुमारी गुप्ता हिला पाटण्यातून अटक करण्यात आली होती. या सगळ्यांचे धागेदोरे तपासले जात आहेत.

उमेदवारांना फटका

राष्ट्रीय स्तरावर गाजलेल्या नीट-यूजी पेपर फुटीच्या घोटाळ्यानंतर समोर आलेल्या या टीईटी पेपर फुटीचा फटका राज्यातील सुमारे ६ लाख उमेदवारांना बसला आहे.

महिम पत्रण प्रा. लि. मध्ये छापला पेपर

आग्रा येथील ज्या प्रिंटिंग प्रेसमध्ये टीईटी पेपरची छपाई झाली त्या महिम पत्रण प्रा. लि., आग्रा येथून प्रश्नपत्रिका बाहेर काढण्याच्या गुन्ह्यात थेट सहभाग असल्याच्या आरोप या तिघांवर आहे. या तिघांचा टीईटी पेपर फुटी प्रकरणात महत्त्वाचा सहभाग असून प्रिटिंग प्रेसमधून प्रश्नपत्रिका पेपर बाहेर काढण्यात या तिघांचा सहभाग आहे. त्याचबरोबर त्यांचे आर्थिक व्यवहारही तपासले जात आहेत.

(इंग्रजीत वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in