
ठाणे : आज महाशिवरात्रीनिमित्त ठाणे जिल्ह्यातील विविध ऐतिहासिक शिवमंदिरांमध्ये भाविकांची अलोट गर्दी उसळणार आहे. त्या अनुषंगाने पोलीस व प्रशासनाकडून सर्वच महानगरपालिकांच्या हद्दीत चोख बंदोबस्त, वाहतूक व्यवस्था आणि भाविकांना सुलभ दर्शन करता यावे यासाठी नियोजन करण्यात आल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून मिळाली आहे.
ठाणे शहरातील बाजारपेठेत असलेले ऐतिहासिक काैपिनेश्वर मंदिर, अंबरनाथ येथील शिव मंदिर, भिवंडीतील लोणाड येथील पुरातन लोणाड शिवमंदिर, खिडकाळी येथील खिडकाळेश्वर महादेव मंदिर, टिटवाळ्यातील गंगा गोरजेश्वर महादेव मंदिर, शहापूर-मुरबाड मार्गावरील श्री संगम क्षेत्र, डोंबिवलीतील पिंपळेश्वर महादेव मंदिर अशा अनेक शिवालयांमध्ये भक्तींचा महासागर उमटलेला आज पहायला मिळणार आहे. यावेळी भाविकांना कोणताही त्रास होऊ नये म्हणून पोलिसांकडून पाचही परिमंडळात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला असून मंदिर व्यवस्थापकांनीही भाविकांच्या महाप्रसाद आणि दर्शनासाठी चोख व्यवस्था आखली आहे.
ठाण्यातील पुरातन कौपिनेश्वर मंदिरात पहाटेपासूनच भाविकांच्या शिवदर्शनासाठी रांगा लागतात. तर अंबरनाथमधील प्राचिन शिवमंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले असून भाविकांच्या सुरक्षेसाठी विशेष उपाययोजना करण्यात आल्या आहेत. शिळफाटा येथील खिडकाळेश्वर मंदिरही पुरातन असून हे एका तलावाकाठी वसलेले सुंदर नक्षीकाम असलेले मंदिर भाविकांचे विशेष आकर्षण आहे. येथेही कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई, कळवा-मुंब्रा येथून भाविक दर्शनासाठी गर्दी करत असतात. टिटवाळ्यातील गंगा गोरजेश्वर महादेव मंदिर ही नदीच्या पात्रात असून येथे जाण्यासाठी भाविकांना होडीतून जावे लागते. भिवंडीतील लोणाडचे शिवमंदिर हे प्राचीन दगडी कलेचा उत्तम नमुना असून भाविकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे.
अंबरनाथचे शिवमंदिर आता नव्या रूपात
उल्हासनगर आणि अंबरनाथ शहराच्या सीमेवर असलेल्या शिलाहारकालीन प्राचीन शिवमंदिराचा परिसर आता नव्या स्वरूपात विकसित होणार आहे. राज्य शासनाने १३८.२१ कोटी रुपयांचा निधी मंजूर करून या ऐतिहासिक मंदिराच्या सुशोभीकरणाला हिरवा कंदील दाखवला आहे. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी गेल्या अनेक वर्षांपासून या मंदिराच्या विकासासाठी सातत्याने पाठपुरावा केला होता. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश मिळाले असून, हे मंदीर लवकरच एक महत्त्वाचे पर्यटन स्थळ आणि वैश्विक शिवभक्तांचे श्रद्धास्थान म्हणून ओळखले जाणार आहे.