

उल्हासनगर : जागतिक आरोग्य दिनी गोरगरीब आणि कामगार कुटुंबांना मोठा दिलासा देणारा निर्णय घेण्यात आला आहे. आता महात्मा ज्योतीराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना राज्यातील कामगार विमा योजना रुग्णालयांमध्येही उपचाराची सुविधा मिळणार आहे. म्हणजेच, खासगी रुग्णालयांपुरती मर्यादित असलेली ही योजना आता सरकारी कामगार रुग्णालयातही खुली झाली आहे आणि विशेष म्हणजे या योजनेअंतर्गत पाच लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार करण्यात येणार असल्याची माहिती रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. विलास डोंगरे यांनी दिली.
जागतिक आरोग्य दिनाचे औचित्य साधत दिनांक ७ एप्रिल २०२५ रोजी राज्यातील कामगार विमा योजना रुग्णालयांमध्ये ‘महात्मा ज्योतीराव फुले जन आरोग्य योजना’चा अधिकृत शुभारंभ करण्यात आला. या योजनेमुळे आता राज्यातील कामगार रुग्णालयांमध्ये येणाऱ्या पात्र लाभार्थ्यांना वैद्यकीय उपचाराचा थेट लाभ घेता येणार आहे. राज्य कामगार विमा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. विलास डोंगरे यांनी ही माहिती दिली. त्यांनी सांगितले की, “या उपक्रमामुळे कामगार आणि गरीब कुटुंबियांना आता सरकारी रुग्णालयांमध्येही महात्मा फुले योजनेचा लाभ मिळणार आहे, ज्यामुळे सर्व सामान्य नागरिकांवरील उपचारांसाठीचा आर्थिक ताण मोठ्या प्रमाणात कमी होईल.”
कर्मचारी राज्य विमा निगमच्या वैद्यकीय लाभ परिषदेने या योजनेत सहभागी होण्यास मंजुरी दिली असून, योजनेचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे दरवर्षी पात्र कुटुंबाला पाच लाख रुपयांपर्यंत मोफत आरोग्य विमा सेवा पुरवणे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या शुभारंभ प्रसंगी डॉ. रूपा भारोटे, डॉ. कुणाल काटे, सुवर्णा पाटील, दयानंद गावडे, शुभम पांचाळ, महेश्वर वडवले यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
राज्य शासनाच्या या निर्णयामुळे आरोग्य सुविधा आता अधिक सुलभ आणि सामर्थ्यवान होणार आहे. सर्वसामान्य नागरिकांसाठी ही एक महत्त्वाची संधी ठरणार असून, सरकारी रुग्णालयांवरील विश्वास आणि सेवा अधिक बळकट होणार आहेत. आता महात्मा फुले योजनेचा लाभ सरकारी कामगार रुग्णालयांतही उपलब्ध झाल्यामुळे हजारो कुटुंबांना मोठा दिलासा मिळणार आहे.
जागतिक आरोग्य दिनी कामगार वर्गासाठी ही एक ऐतिहासिक आणि स्वागतार्ह घडामोड आहे. या योजनेमुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना मोठा दिलासा मिळेल. मोफत आणि दर्जेदार उपचारांची सुविधा उपलब्ध झाल्याने गरजू रुग्णांना खासगी रुग्णालयात धावपळ करण्याची गरज उरणार नाही. या योजनेतून अधिकाधिक रुग्णांनी लाभ घ्यावा, असे आवाहन मी करतो.
- डॉ. विलास डोंगरे, रुग्णालय अधीक्षक