लोकसभेच्या सर्व जागा जिंकण्याचा निर्धार: ठाण्यात महायुतीचा मेळावा

केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील म्हणाले, "दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा, या महाराष्ट्र गीतातील ओळी आपल्याला लोकसभा निवडणुकीत प्रत्यक्षात आणायच्या आहेत
लोकसभेच्या सर्व जागा जिंकण्याचा निर्धार: 
 ठाण्यात महायुतीचा मेळावा

ठाणे : ‘दिल्लीचेही तख्त राखितो महाराष्ट्र माझा’ या महाराष्ट्र गीतामधील ओळ सत्यात उतरवण्याची वेळ आली असून देशाला विजयी करायचे असेल तर नरेंद्र मोदी यांच्याशिवाय पर्याय नसल्याचे सांगत मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान पदी पाठ्वण्याशिवाय पर्याय नाही, असे सांगत जिल्ह्यातील तीनही लोकसभेच्या जागा जिंकण्याचा निर्धार ठाण्यातील महायुतीच्या मेळाव्यात करण्यात आला. राम मंदिरावरून आता राजकारण सुरू आहे; मात्र ७० वर्षात यांना राम मंदिर का बांधता आले नाही, यासाठी मोदींनाच पुढाकार घ्यावा लागला. अशा शब्दात या मेळाव्यात विरोधकांवरही टीका करण्यात आली. महाराष्ट्राला विकासाकडे घेऊन जाण्याचे काम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार करत असून, मोदींचे हात बळकट करण्याचे काम हे तीनही नेते करत असल्याचे सांगत या मेळाव्यात या तीनही नेत्यांच्या कामाचे कौतुक यावेळी करण्यात आले.

रविवारी ३६ जिल्ह्यांमध्ये महायुतीचे जिल्हास्तरीय मेळावे घेण्यात आले. ठाण्यातील महायुतीचा मेळावा हा शिवाजी मैदान या ठिकाणी घेण्यात आला. मंत्री रवींद्र चव्हाण, केंद्रीय मंत्री कपिल पाटील, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार गणेश नाईक, प्रताप सरनाईक, किसन कथोरे, प्रमोद हिंदुराव, माजी खासदार डॉ. संजीव नाईक, संदीप नाईक, मंदा म्हात्रे, गीता जैन, माजी खासदार विनय सहस्रबुद्धे, निरंजन डावखरे, संजय केळकर, शिवसेनेचे प्रवक्ते नरेश म्हस्के आणि राष्ट्रवादीचे प्रवक्ते आनंद परांजपे तसेच महायुतीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील म्हणाले, "दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा, या महाराष्ट्र गीतातील ओळी आपल्याला लोकसभा निवडणुकीत प्रत्यक्षात आणायच्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जनतेचा विश्वास आहे. किसान सन्मान, आयुष्मान भारतसारख्या अनेक सरकारी योजनांमधून जनतेचे जीवनमान बदलले. आतापर्यंत शेतकऱ्यांना २ लाख ८५ हजार कोटी रुपये किसान सन्मानमधून दिले गेले, तर कॉंग्रेसने केवळ ४० हजार कोटींची शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊन अनेक वर्ष कर्जमाफीचे तुणतुणे वाजविले. २०१९ मध्ये देवेंद्र फडणवीसांच्या पाठीत खंजीर खुपसल नसता, तर दहा वर्ष ते मुख्यमंत्री राहिले असते. आता विरोधी आघाडीला जागा दाखविण्याची वेळ आली आहे. त्यासाठी महायुतीच्या कार्यकर्तयांनी एकदिलाने कार्य करावे,'' असे आवाहन त्यांनी केले.

खासदार श्रीकांत शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामाचे कौतुक करत ही निवडणूक लोकसभेपेक्षा जे देशाचे नेतृत करत आहेत त्यांच्यासाठी महत्त्वाची असून अब कि बार ४०० पार असा नारा शिंदे यांनी यावेळी दिला. राम मंदिराच्या उभारणीचे काम जे ७० वर्षांत विरोधकांना जमले नाही ते मोदी यांनी करून दाखवले. जिल्ह्यात महायुतीचे तीनही उमेदवार मोठ्या फरकाने निवडणून देण्याचे आवाहनही शिंदे यांनी यावेळी केले.

देशातील मोठे सत्तांतर एकनाथ शिंदे यांनीच केले

देवेंद्र फडणवीस हे शब्दाला जगणारे नेते असून, मुंबईची सत्ता म्हणजेच मुंबई महापालिका केवळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शब्द टाकला म्हणून उद्धव ठाकरे यांना दिली, असा आरोप नरेश म्हस्के यांनी यावेळी केला. देशातील मोठे सत्तांतर एकनाथ शिंदे यांनीच केले असल्याचे त्यांनी सांगितले, तर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या कामांचे कौतुक करत पुढील काळात सर्वांनी नमो सैनिक व्हावे, असे आवाहन म्हस्के यांनी केले. ठाणे जिल्ह्यातील वातावरण राममय करून महायुतीने लोकसभेच्या तिन्ही जागा जिंकाव्यात, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते आनंद परांजपे यांनी केले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in