(संग्रहित छायाचित्र)
(संग्रहित छायाचित्र)

खासदार, इच्छुकांचे मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी खेटे सुरूच; नाशिक आणि अमरावतीच्या जागेसाठी गोडसे, अडसूळ मुख्यमंत्र्यांच्या दारी

महायुतीतील जागा वाटपांचा पेच अजून सुटलेला नाही. ठाणे, पालघर, नाशिक आणि संभाजीनगर या महत्त्वाच्या जागांबाबत शिवसेना अजूनही आग्रही आहे.

ठाणे : खासदारकीची उमेदवारी आपल्या पदरात पाडून घेण्यासाठी खासदार तसेच इच्छुकांचे खेटे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील निवासस्थानी सुरूच असून रविवारी नाशिकच्या जागेसाठी खासदार हेमंत गोडसे यांनी पुन्हा मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आहे. त्यांच्या या भेटीमुळे गोडसे अजूनही नाशिकच्या जागेसाठी आग्रही असल्याचे स्पष्ट झाले आहे. दुसरीकडे अमरावतीमध्ये बच्चू कडूनंतर राणा दाम्पत्याविरोधात उभ्या ठाकलेल्या माजी आमदार अभिजीत अडसूळ यांनी देखील मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आहे. या दोघांनाही मुख्यमंत्र्यांनी अद्याप कोणत्याही प्रकारचे आश्वासन दिले नसून मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर गोडसे आणि अडसूळ या दोघांनीही कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया दिलेली नाही.

महायुतीतील जागा वाटपांचा पेच अजून सुटलेला नाही. ठाणे, पालघर, नाशिक आणि संभाजीनगर या महत्त्वाच्या जागांबाबत शिवसेना अजूनही आग्रही आहे. सिंधुदुर्ग -रत्नागिरी मतदारसंघासाठी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे नाव निश्चित झाले आहे. विशेष म्हणजे या चारही जागा शिवसेनेच्याच आहेत. या जागांवर शिवसेनेचे खासदार असतानाही भाजप आणि अजित पवार गटाने या जागांवर दावा सांगितल्याने शिंदे गटाची चांगलीच कोंडी झाली आहे. दुसरीकडे नाशिक आणि विशेष करून ठाण्याच्या जागेवरून कमालीचा संघर्ष निर्माण झाला आहे. ठाण्याची जागा भाजपला मिळणार की ही जागा पुन्हा शिवसेनेकडे जाणार यावर अद्याप निर्णय झाला नसल्याने या ठिकाणी महायुतीला उमेदवार जाहीर करता आलेला नाही. याशिवाय नाशिकच्या जागेचा तिढाही अद्याप सुटलेला नाही. नाशिकची जागा शिवसेनेकडे राहावी यासाठी यापूर्वीच नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील निवास्थानी शक्तिप्रदर्शन केले होते. त्यावेळी गोडसे यांना कोणावरही अन्याय होऊ देणार नाही असे आश्वासन मुख्यमंत्र्यांच्या वतीने देण्यात आले होते. मात्र गोडसे यांनी पुन्हा रविवारी मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यातील निवासस्थानी त्यांची भेट घेऊन नाशिकच्या जागेसाठी आग्रह धरला आहे.

केवळ गोडसेच नव्हे तर शिवसेनेचे माजी आमदार अभिजीत अडसूळ यांनी देखील रविवारीच मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. शिवसेनेच्‍या एकनाथ शिंदे गटाचे नेते माजी खासदार आनंदराव अडसूळ यांनी अमरावतीच्‍या जागेवर दावा केला आहे. ही जागा शिवसेनेची आहे. आम्‍हालाच उमेदवारी मिळेल, असे अडसूळ यांचे म्‍हणणे आहे. नवनीत राणा यांचा प्रचार करण्‍यापेक्षा राजकारणातून संन्‍यास घेऊ, असा इशाराच अडसूळ यांनी दिला होता. आनंदराव अडसूळ यांचे पुत्र अभिजीत अडसूळ हे देखील उमेदवारीसाठी इच्‍छूक आहेत. मध्यंतरी तानाजी सावंत यांच्या समर्थकांनी देखील ठाण्यातच मुख्यमंत्र्यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे खासदारकी पदरात पाडून घेण्यासाठी खासदार आणि इच्छुकांचे मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाचे खेटे संपत नसल्याचे उघड झाले आहे.

logo
marathi.freepressjournal.in