पुन्हा कपिल पाटील विरुद्ध बाळ्या मामा; भिवंडी लोकसभेत महायुती विरुद्ध महाविकास आघाडीचा सामना रंगणार

केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागलेले भाजप खासदार कपिल पाटील यांनी भिवंडी तालुक्यातील दिवे अंजुर गावचे सरपंच म्हणून आपल्या राजकीय करकीर्दीला सुरुवात केली
पुन्हा कपिल पाटील विरुद्ध बाळ्या मामा; भिवंडी लोकसभेत महायुती विरुद्ध महाविकास आघाडीचा सामना रंगणार

भिवंडी : भिवंडी लोकसभा मतदारसंघावर दावा ठोकत आगामी २०२४ लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून ठाणे ग्रामीणचे दिग्ग्ज नेते सुरेश म्हात्रे उर्फ (बाळ्या मामा) यांनी शरद पवारांच्या उपस्थित नुकताच शिंदे गटाला सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यांनी भाजपचे केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या विरुद्ध निवडणुकीच्या मैदानात उतरण्याची तयारी केली. महाविकास आघाडीचे मित्र पक्ष असलेल्या काँग्रेसमधून माजी खासदार सुरेश टावरे, जिजाऊ संस्थेचे निलेश सांबरे हे मात्तबर उमेदवारही लोकसभेच्या मैदानात उरण्याची शक्यता आहे; मात्र कॉंग्रेसचे भिवंडी जिल्हाध्यक्ष माजी आमदार रशिद ताहीद मोमीन यांना एकमेव अध्यक्ष पदावर ठेवले आहे. तसेच काँग्रेसचे माजी पदाधिकारी सपा आणि एएमआयएमच्या वाढत्या जनप्रतिसादामुळे पक्षांतर करण्याच्या उंबरठ्यावर येवून ठेपले आहेत.

२०१९ लोकसभा निवडणुकीच्या आकडेवारीनुसार, भाजपाचे केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांना ५२.९५ टक्क्यांनी ५ लाख २३ हजार ५८३ मतदान झाले होते, तर काँग्रेसचे सुरेश टावरे यांना ३७ टक्क्यांनी ३ लाख ६७ हजार २५४ इतके मतदान होऊन दुसरी वेळ पराजय स्वीकारावा लागला होता. दरम्यान २०१९ मध्ये भिवंडी लोकसभा मतदारसंघातील ६ विधानसभा क्षेत्रांपैकी शहापूरमध्ये अजित पवार गटाचे दौलत दरोडा हे आमदार आहेत, तर मुरबाडमधून भाजपचे किसन कथोरे, भिवंडी पश्चिम मधून भाजपचे महेश चौघुले, भिवंडी पूर्वमधून समाजवादी रईस शेख, भिवंडी ग्रामीणमधून शिंदे गटाचे शांताराम मोरे आणि कल्याण पश्चिममधून शिंदे गटाचे विश्वनाथ भोईर हे असे सहाही विधानसभामधून विद्यमान आमदार आहेत. तसेच ग्रामीण भागात शिंदे गट आणि भाजपचे सारखेच राजकीय वर्चस्व असून, जिल्हा परिषदसह बहुतांश पंचायत समिती आणि ग्रामपंचायतीही महायुतीच्या ताब्यात आहेत.

केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागलेले भाजप खासदार कपिल पाटील यांनी भिवंडी तालुक्यातील दिवे अंजुर गावचे सरपंच म्हणून आपल्या राजकीय करकीर्दीला सुरुवात केली. त्यानंतर पंचायत समिती, जिल्हा परिषद सदस्य म्हणून त्यांनी आपल्या कार्याची छाप पाडली. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसकडून जिल्हा परिषद अध्यक्षपदासह जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्षपदही त्यांनी भूषवलं. पुढे २०१४ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर कपिल पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. २०१४ व २०१९ मधील भिवंडी लोकसभा मतदारसंघातून विजयही त्यांनी संपादित केला. दांडगा जनसंपर्क आणि प्रशासकीय कामाची चांगली ओळख असल्याने त्यांनी अल्पावधीतच भाजपमध्ये आपलं वेगळं स्थान निर्माण केलं.

मुंबईतील सेनेचे वर्चस्व मोडून काढण्याकरिता ठाणे जिल्ह्यातील सत्तेला आव्हान देण्याकरिता कपिल पाटील यांना केंद्रात राज्यमंत्री पदावर संधी देण्याचे धोरण भाजपचे असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, ग्रामीण भागातील दिग्गज नेते सुरेश (बाळ्या मामा) म्हात्रे यांनी राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश केला. शरद पवार यांच्या उपस्थितीत बाळ्या मामांनी राष्ट्रवादीचे नाशिक येथे झालेल्या अधिवेशनात प्रवेश केला. अवघ्या काही महिन्यांपूर्वी म्हात्रेंनी शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’ करत काँग्रेसमध्येही प्रवेश केला होता. शिवसेना-मनसे-भाजप-शिवसेना-काँग्रेस नंतर आता पुन्हा राष्ट्रवादी असा सुरेश म्हात्रेंचा राजकीय प्रवास आहे.

सुरेश गोपीनाथ म्हात्रे हे बाळ्या मामा नावाने प्रसिद्ध असून, त्यांनी शिवसेना ठाणे ग्रामीण जिल्हा संपर्क प्रमुख म्हणूनही काम केलं होत. ठाणे जिल्हा परिषदेचे गटनेते, तर बांधकाम, आरोग्य समितीचे सभापती २०१४ मध्ये सुरेश म्हात्रेंनी मनसेकडून लोकसभा निवडणूक लढवली होती.

जिल्ह्यात एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात शिवसेनेचे वर्चस्व

२०१४ च्या विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेना-भाजप यांच्यात झालेल्या फारकतीमुळे ठाणे जिल्ह्यातील शिवसेनेचे प्राबल्य कमी करण्यासाठी भाजप पक्षश्रेष्ठींकडून खा. पाटील यांना केंद्रीय मंत्रिमंडळात संधी दिली. विशेष म्हणजे, ठाणे जिल्हा भाजपचे दिवंगत रामभाऊ म्हाळगी आणि रामभाऊ कापसे यांच्यापासून भाजपचा बालेकिल्ला राहिला आहे; मात्र या जिल्ह्याला केंद्रात संधी मिळाली नाही. कालांतराने भाजपकडून शिवसेनेने ठाणे जिल्हा हिसकावून घेतला व अगोदर आनंद दिघे यांच्या नेतृत्वात तर सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेनेचे जिल्ह्यातील अनेक शहरांमध्ये वर्चस्व आहे.

logo
marathi.freepressjournal.in