मलंगगडाला मुख्यमंत्री मुक्ती मिळवून देणार; खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचा पुनरुच्चार

कल्याण येथील श्रीमलंगडाच्या पायथ्याशी मागील आठवडाभरापासून राज्यस्तरीय अखंड हरिनाम सप्ताह - श्री मलंगगड हरिनाम महोत्सव सुरू होता.
मलंगगडाला मुख्यमंत्री मुक्ती मिळवून देणार; खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचा पुनरुच्चार
Published on

कल्याण : "राज्यस्तरीय अखंड हरिनाम सप्ताह तसेच वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून नवीन पिढी ही आपला धर्म, संस्कृती आणि ही चळवळ अशीच पुढे घेऊन जाणार आहे. देशात प्रभू श्रीराम मंदिर उभे राहील याचा विचार आपल्यापैकी कोणीच केला नव्हता; मात्र ते राम मंदिर आज उभे राहत आहे. येणाऱ्या काळात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मलंगगडाला मुक्ती दिल्याशिवाय राहणार नाहीत", असे ठाम प्रतिपादन कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांनी केले.

कल्याण येथील श्रीमलंगडाच्या पायथ्याशी मागील आठवडाभरापासून राज्यस्तरीय अखंड हरिनाम सप्ताह - श्री मलंगगड हरिनाम महोत्सव सुरू होता. अगदी दिमाखदार पद्धतीने आयोजित करण्यात आलेल्या या कीर्तन महोत्सवाचा मंगळवारी समारोप झाला. या समारोपाच्या भाषणावेळी त्यांनी हे प्रतिपादन केले आहे.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत कोकण प्रांतातील या सर्वात मोठ्या मलंगगड अखंड हरिनाम सप्ताहाला मागील आठवड्यात प्रारंभ झाला होता. मागील आठ दिवस केवळ आजूबाजूच्या पंचक्रोशीतील नव्हे, तर ठाणे आणि रायगड जिल्ह्यातील वारकरी संप्रदायाची मंडळी दररोज हजारोंच्या संख्येने सहभागी झाली होती. या अखंड हरिनाम सप्ताहात विविध नामवंत कीर्तनकारांनी रचलेल्या पायावर कळस चढवण्याचे काम अखेरच्या दिवशी महंत ह.भ.प. भास्कर गिरी महाराज यांनी काल्याच्या कीर्तनातून केले. तसेच यावेळी उपस्थित वारकऱ्यांनी प्रतीकात्मक दहीहंडी फोडत त्याचा प्रसाद ग्रहण केला.

या सप्ताह सोहळ्याच्या समारोपाला शंकराचार्य महाराज, मलंगगडासाठी जीवन वाहिलेले दिनेश देशमुख, राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत, मावळचे खासदार श्रीरंग बारणे, शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी, शिवसेना राज्य समन्व्यक, प्रवक्ते नरेश म्हस्के, जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, डोंबिवली शहर प्रमुख राजेश मोरे, कल्याण पूर्व शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यासह अनेक मान्यवर मंडळी उपस्थित होती.

नेत्रदीपक दीपोत्सव

मलंगगडाच्या पायथ्याशी सुरू असणाऱ्या राज्यस्तरीय अखंड हरिनाम सप्ताहातील सातवा दिवस अत्यंत उत्कट आणि देदीप्यमान ठरला. निमित्त होते अत्यंत भव्यदिव्य स्वरूपात आयोजित अशा दीपोत्सव सोहळ्याचे. यावेळी प्रज्वलित झालेल्या हजारो दिव्यांच्या माध्यमातून जणू काही दशदिशा उजळून निघाल्याचे दिसून आले. या दीपोत्सवाची सुरुवात उपस्थित साधू संतांनी दीपमंत्राच्या उच्चाराने केल्यानंतर आधी व्यासपीठावरील समई प्रज्वलित करण्यात आल्या. त्यानंतर सभामंडपात उपस्थित असणाऱ्या प्रत्येक वारकऱ्याने आपल्याकडील प्रत्येक दिवा प्रज्वलित केला.

logo
marathi.freepressjournal.in