

मुरबाड : मुरबाड माळशेज घाट रस्त्यालगत असलेल्या वैशाखर येथे सकाळच्या सुमारास एसटी बस व स्कॉर्पिओ कार यांच्यात मोठी धडक होऊन चार जण ठार झाले.
मृतांमध्ये अविनाश रामचंद्र काकडे, नीता अशोक धुरे, मीना कल्याण मडके आणि अभिषेक भाऊसाहेब मोटे (चालक) यांचा समावेश असून हे सर्व (ता. नेवासा) येथील रहिवासी असल्याचे समजते.
प्रचंड वेगाने चाललेल्या एसटी बसमुळे हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. मुरबाड, कल्याण, माळशेज घाट, नगर या रस्त्यावर आतापर्यंत २५ ते ३० जणांचा मृत्यू झाला असून रस्ता अरुंद आणि वेडीवाकडी वळणे असल्याने अपघातांना निमंत्रण मिळते आहे. त्यामुळे रस्ता बनवणाऱ्या ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी होत आहे.
धोकादायक उतार असूनही सुसाट वेगाने धावणारी वाहने हीदेखील एक समस्या आहे. विशेषतः एसटीच्या बसेसही भयंकर वेगाने हाकल्या जात असून त्यांच्यावर नियंत्रण ठेवले जात नसल्याची नागरिकांची तक्रार आहे.
आरटीओ ने गेल्या महिन्यात अपघातानंतर कारवाईचा वडगाव उगारला असून कालीपिली इको यांची तपासणी रोज केली जात आहे, मात्र रस्त्यावर सुसाट वेगवान एसटी बसेसवर कोणत्याही प्रकारची कारवाई आरटीओकडून होताना दिसत नाही. परिवहन महामंडळ आणि आरटीओ हे दोन्हीही परिवहन मंत्र्यांच्या अखत्यारीत येतात. हे मंत्री आता आपल्याच विभागावर कशाप्रकारे कारवाई करते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.