मामा-भांजे डोंगरावरील आग लागली की लावण्यात आली? मनसेची वनमंत्री गणेश नाईकांकडे चौकशीची मागणी

ठाण्यातील प्रसिद्ध नैसर्गिक ठिकाण असलेल्या मामा भांजे डोंगरावर आग लागल्याने मोठ्या प्रमाणात झाडे जळाली असून नैसर्गिक साधन संपत्तीचे नुकसान झाले आहे.
राज ठाकरे
राज ठाकरे संग्रहीत छायाचित्र
Published on

ठाणे : ठाण्यातील प्रसिद्ध नैसर्गिक ठिकाण असलेल्या मामा भांजे डोंगरावर आग लागल्याने मोठ्या प्रमाणात झाडे जळाली असून नैसर्गिक साधन संपत्तीचे नुकसान झाले आहे. मात्र ही आग लागली की लावण्यात आली असा संशय मनसेच्या वतीने उपस्थित करण्यात आला आहे. याच डोंगरवार झालेल्या अनधिकृत बांधकामांबत यापूर्वीच मनसेच्या वतीने आवाज उठवण्यात आला होता. तर ठाणे महापालिकेनेही या ठिकाणी मोठ्या प्रमाणात झाडे लावली होती. आता संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून दोषींवर गुन्हा दाखल करण्याची मागणी मनसेचे विद्यार्थी सेनेचे सरचिटणीस संदीप पाचंगे यांनी वनमंत्री गणेश नाईक यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील मामा-भांजे डोंगर परिसरात लागलेल्या भीषण आगीत मोठ्या प्रमाणात झाडे बेचिराख झाली असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ठाणे महापालिकेने काही वर्षांपूर्वी मोठ्या प्रमाणावर वृक्षलागवड केली होती, मात्र या आगीत वनसंपदा उद्ध्वस्त झाली आहे. विशेष म्हणजे ही आग लागली नसून कोणी तरी जाणीवपूर्वक लावल्याचा संशय संदीप पाचंगे यांनी केला आहे. दोन दिवसांपूर्वी ठाण्यातील संजय गांधी राष्ट्रीय उद्यान परिसरातील मामा-भांजे डोंगरावर ही भीषण आग लागली होती. हा भाग संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या संरक्षित क्षेत्रात मोडत असून, येथे अनधिकृत बांधकामे आणि घुसखोरीचे प्रमाण वाढले आहे. मामा-भांजे डोंगर परिसरात गर्दुल्ले, काही जण नशा करत असल्याचे वारंवार निदर्शनास आले असल्याचे सांगण्यात आले.

संजय गांधी राष्ट्रीय उद्यान ठाणे शहरासाठी एक अनमोल ठेवा आहे. निसर्गसंपत्तीचे रक्षण करणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. मात्र, वनविभागाच्या निष्क्रियतेमुळे अनधिकृत बांधकामे वाढत आहेत आणि आता या आगीसारख्या घटनांमुळे संपूर्ण निसर्ग धोक्यात आला आहे. वनविभाग आणि पोलीस प्रशासनाने याप्रकरणी गांभीर्याने लक्ष घालून दोषींवर कठोर कारवाई करावी.

- संदीप पाचंगे, सरचिटणीस, मनविसे

logo
marathi.freepressjournal.in