
पालघर : डहाणू तालुक्यातील घोल येथे असलेल्या महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ लिमिटेडच्या भात खरेदी केंद्रात मंखळवारी पहाटे भीषण आग लागली. या गोदामात सुमारे ३२४० क्विंटल भाताचा साठा करण्यात आला होता. घटनेची माहिती मिळताच अदानी डहाणू थर्मल अग्निशमन दलाच्या पथकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि आग विझविण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू केले.
तब्बल पाच तासांच्या अथक प्रयत्नानंतर मंगळवारी आग आटोक्यात आणण्यात अदानी डहाणू थर्मल अग्निशमन केंद्राला यश आल्याची माहीती पोलिसांनी दिली आहे. तातडीने तीन अग्निशमन गाड्या घटनास्थळी दाखल झाले होते. या कठीण परिस्थितीतही अदानी डहाणू थर्मल अग्निशमन दलाने दाखवलेल्या तत्परतेमुळे आगीचा फैलाव रोखण्यात आणि मोठे नुकसान टाळण्यात यश आले. स्थानिक प्रशासनाने अग्निशमन दलाच्या परिश्रमांचे आणि तत्परतेचे कौतुक केले आहे. सदर घटनेमागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. अधिक तपास सुरू असून, प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि गोदामांमध्ये सुरक्षिततेच्या उपाययोजना काटेकोरपणे पाळण्याचे आवाहन केले आहे.