

चंद्रकांत सुतार/माथेरान :
एकेकाळी पंधरा दिवस दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये गजबजून जाणारा माथेरानचा पर्यटन सीझन यावर्षी अक्षरशः तीन ते चार दिवसच होताना दिसत आहे. लक्ष्मीपूजनाच्या दुसऱ्या दिवशीही शहरात अपेक्षित पर्यटकांचा ओघ दिसला नाही. हॉटेल, लॉजिंग, दुकाने, खानावळी, तसेच घोडेवाले, हातगाडीवाले यांचे उत्पन्न कोसळले असून, संपूर्ण माथेरानच्या अर्थचक्रावर याचा गंभीर परिणाम झाला आहे.
हॉटेल्सची रंगरंगोटी, दुकानदारांनी केलेली सजावट, नवीन मालाची ऑर्डर, खाद्यपदार्थांची तयारी सर्व काही तयारीत होते. परंतु पर्यटक मात्र नाहीसे झाले. अनेक लॉजिंग-हॉटेल्स रिकामी आहेत; अनेकांकडे रूमसाठी विचारणाही होत नाही. येणाऱ्या थोड्या फार पर्यटकांमध्ये बहुतेक स्थानिक किंवा जवळच्या परिसरातील आहेत. त्यामुळे ‘सीझन सुरूच झालेला नाही’ अशी हताश भावना व्यापारी वर्गात आहे. माथेरानमध्ये मूलभूत सुविधा शून्याच्या घरात आहेत. घाट मार्गावरील वाहतूक व्यवस्थापन ढिसाळ आहे; दस्तुरी नाक्यावरील पार्किंग अत्यंत मर्यादित आहे; पर्यटकांसाठी शिस्तबद्ध स्वागत व्यवस्था नाही. त्यामुळे जे लोक एकदा त्रास सहन करतात, ते पुन्हा येत नाहीत. दीर्घकाळात याचाच सर्वाधिक फटका माथेरानच्या अर्थव्यवस्थेला बसणार आहे, असा आरोप व्यावसायिकांनी केला आहे.
दिवाळी सीजनकडे आम्ही खूप आशेने वाट पाहत होतो. परंतु दिवाळी सीजन फक्त लक्ष्मीपूजननंतरचे चार दिवसच व्यवसाय मिळणार असल्याने आमची आर्थिक घडी कोलमडली आहे.
- रवी कदम, व्यावसायिक
जून महिन्यात आम्ही या ठिकाणी आलो होतो त्यावेळी सुद्धा घाटात प्रचंड प्रमाणात गर्दी होती. यावेळी वाटले की प्रशासनाने काहीतरी व्यवस्था करून हा प्रश्न मार्गी लावला असेल. परंतु ‘ये रे माझ्या मागल्या’ अशीच परिस्थिती याहीवेळी आम्हाला अनुभवायला मिळाली. ही खरोखरच दुर्दैवी बाब म्हणावी लागेल.
शंतनू कर्णिक, पर्यटक, मुंबई